तडीपार आरोपीस अटक; कोयता जप्त

पिंपरी :आदेशाचा भंग करून बेकायदेशीररित्या पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत तडीपार असताना आरोपी मिळून आला. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही घटना रविवार 24 मे रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास संग्रामनगर झोपडपट्टी, अंकुश चौकाजवळ, ओटा स्कीम निगडी येथे घडली.

याबाबत जयवंत जगन्नाथ राऊत पोलीस शिपाई, गुन्हे शाखा युनिट एक यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. आयुब चमन खान (वय 28, रा. संग्राम नगर झोपडपट्टी, ओटा स्कीम निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आयुब खान यास पिंपरी चिंचवड पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतून दोन वर्षाकरिता तडीपार केले आहे. तडीपार असताना देखील कोणतीही परवानगी न घेता आरोपीने शहराच्या हद्दीत प्रवेश केला आहे. याशिवाय घातक शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध असताना त्याने धारदार लोखंडी कोयता विनापरवाना जवळ बाळगून मनाई आदेशाचा भंग केला आहे. निगडी पोलीस तपास करत आहेत. तडीपार आरोपीस अटक
महिलेच्या वडिलांना घरात घुसून मारहाण!
पिंपरी: एका महिलेच्या घरात घुसून तिच्या वडिलांना चौघा जणांनी बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली आणि पुन्हा मारहाण करण्याची धमकी देऊन निघून गेले. ही घटना रविवार 24 मे रोजी रात्री पावणेतीन वाजण्याच्या सुमारास टॉवर नंबर तीन, फ्लॅट नंबर 1202 लोढा बेलमेंडो सोसायटी, गहुंजे, ता. मावळ येथे घडली.
या प्रकरणी एका महिलेने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कुणाल कुमार (वय 35 ),सुरभी सिन्हा (वय 34), शांतनु शेखर (वय 30), स्वतभ कुमार (वय 24, सर्व राहणार बाणेर पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक एक ते चार हे फिर्यादी महिलेच्या घरी येऊन फिर्यादीच्या घरात घुसून फिर्यादीचे वडील रवींद्र कुमार चोबे यांना आरोपी नंबर एक यांनी डाव्या कानपट्टीवर तीन चार वेळा बुक्क्या मारल्या तसेच आरोपी नंबर एक तीन व चार यांनी फिर्यादी यांचे वडिलांना शिवीगाळ करत पुन्हा मारहाण करण्याची धमकी देऊन निघून गेले. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.

