चिंचवड विधानसभेच्या शाश्वत विकासासाठी महायुती कटिबद्ध

आमदार अश्विनी जगताप यांनी घेतल्या सोसायटी धारकांच्या भेटी
चिंचवड : चिंचवड विधानसभेच्या शाश्वत विकासासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळेच आज या मतदारसंघाचा कायापालट झाला आहे. चिंचवड मतदार संघात विकासाची घोडदौड कायम ठेवण्यासाठी महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांना आपण सर्वांनी प्रचंड मतांनी विजयी करत विधानसभेवर पाठवावे असे आवाहन आमदार अश्विनी जगताप यांनी केले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आरपीआय (ए) व मित्र पक्षाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारार्थ आमदार अश्विनी जगताप यांनी वाकड, विनोदे वस्ती परिसरातील सोसायटी धारकांच्या गाठीभेटी घेतल्या.
यावेळी त्यांच्यासोबत भारती विनोदे, विशाल कलाटे प्रसाद कस्पटे काशिनाथ गुरव यांच्यासह भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. वाकड, विनोदे वस्ती परिसरातील रॉयल कॅस्टल, ॲटलांटा, साई लक्झरीया, ट्रिनिटी, इट्रेंड, ऍक्रोपॉलिस, कोहिनूर कोर्टयार्ड यासह प्रमुख सोसायटींना भेटी देत तेथील मतदारांशी संवाद साधला. नागरिकांनीही यावेळी आमदार अश्विनी जगताप यांना सकारात्मक प्रतिसाद दिला.
सोसायटी धारक मतदार भाजपच्याच पाठीशी..
आमदार अश्विनी जगताप म्हणाल्या की, वाकड- विनोदे वस्ती हा परिसर आयटी हब हिंजवडीचे प्रवेशद्वार आहे. या परिसरात वाढते नागरिकरण यामुळे वाहतूकीची समस्या निर्माण होत होती. परंतु आता मेट्रो या परिसरात धावणार आहे. त्याचे काम देखील वेगाने सुरू आहे. तसेच सिग्नल फ्री, सुसज्ज रस्ते करण्याचाही भाजपचा मानस आहे. भारतीय जनता पक्षाने शंकर जगताप यांना या मतदारसंघात नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे नक्कीच या भागातील सोसायटी धारक मतदार शंकर जगताप यांच्या म्हणजेच भाजपच्या पाठीशी राहतील असा ठाम विश्वास अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला.