फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
शिक्षण

एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदविली मते

एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदविली मते

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसपासून ते महात्मा गांधी आणि लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीपर्यंत देशभरात सेवा-सुरक्षा-समर्पण पंधरवडा साजरा केला जातो. समाजामध्ये सेवा कार्याचे महत्व वाढावे आणि राष्ट्राप्रती समर्पण भावना जागृत व्हावी. तसेच, नागरी सुरक्षाबाबत जनजागृती करावी. यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशव्यापी उपक्रम राबवले जातात. भोसरी विधानसभा मतदार संघामध्ये आमदार महेश लांडगे यांनी हा उपक्रम सक्षमपणे राबवला. त्याला विद्यार्थी आणि शाळांनी मोठा प्रतिसाद दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहराबद्दल तुम्हाला काय वाटते? शहरातील कोणते प्रकल्प तुम्हाला आवडतात? या प्रकल्पांमधून तुम्ही काय बोध घेतला? प्रकल्पांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे? असे अनेक प्रश्न भोसरी परिसरातील शाळांमधील विद्यार्थ्यांसमोर ठेवले आणि तब्बल एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आणि आपली मते मांडली आहेत.

सेवा सुरक्षा समर्पण पंधरवड्यामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून शहरातील महापालिका आणि खासगी शाळांमध्ये निबंध, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे आयोजन केले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी चक्क शहरात उभारल्या जाणाऱ्या संविधान भवनाबाबत निबंध आणि चित्रकलेतून आपले मत व्यक्त केले.

या उपक्रमाच्या समन्वयक श्रद्धा पानमंद म्हणाल्या की, पिंपरी-चिंचवड शहराची भौतिक संरचना, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून साकारलेला ‘वेस्ट टू एनर्जी’ हा कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प, संविधान भवन व इंटरनॅशनल लायब्ररी, नमामी इंद्रायणी, छत्रपती संभाजी महाराज यांचा ‘स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण’, मेट्रो सिटी पिंपरी-चिंचवड, स्पोर्ट्स हब पिंपरी-चिंचवड, क्लिन सिटी-ग्रीन सिटी, आरोग्य क्षेत्रात आत्मनिर्भर पिंपरी-चिंचवड, एज्युकेशन हब, देव-देश- धर्म अन्‌ संस्कृती, चिखली-मोशी-चऱ्होली रेसिडेन्सिअल कॉरिडॉर विकासाचे रोल मॉडेल, जलस्वयंपूर्ण पिंपरी-चिंचवड, ऑटो, आयटी अन्‌ इंडस्ट्रिअल हब यांसारखे विषय विद्यार्थ्यांसमोर होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. प्रकल्पांचा अभ्यास करावा आणि त्यातून त्यांना नवनवीन कल्पना सूचाव्यात. ज्याचा शहर विकासाच्या दृष्टीने देखील फायदा होईल, असे स्पर्धांचे स्वरुप आहे.

भोसरी विधानसभा मतदार संघ आणि परिसरातील विविध शाळांमध्ये या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. १२० शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवला. ज्यामध्ये सुमारे एक लाख विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पना चित्रांच्या माध्यमातून पुढे आणल्या. काहींनी निबंधाच्या स्वरूपात तर काहींनी वक्तृत्वातून आपल्या भावना मांडल्या.

या संदर्भात आमदार महेश लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराची वाटचाल शाश्वत विकासाच्या दिशेने सुरू आहे. त्यासंदर्भात महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. त्याबाबत जनजागृती व्हावी. नव्या पिढीला शहरातील प्रकल्प आणि त्यांची भविष्यातील उपयोगिता याबाबत माहिती मिळावी. यासाठी आम्ही ‘सेवा-सुरक्षा-समर्पण’ पंधरवड्यानिमित्त शालेय स्पर्धा आयोजित केल्या. त्याला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी आणि शाळांनी प्रतिसाद दिला. सदर अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘बलशाली भारत’ घडवण्यासाठीचा छोटासा प्रयत्न आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"