माझ्याकडे `कोल्डप्ले`ची तिकीटं नाहीत..

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : राज्याचा गृहमंत्री असल्यामुळे माझ्यासमोर अनेक अडचणी आहेत. त्यासह कोल्डप्लेच्या तिकीटांमुळे वेगळीच अडचण निर्माण झाली आहे. मी सर्वांना सांगू इच्छितो की मला या कार्यक्रमाची तिकीटं मिळालेली नाहीत. त्यामुळे कोणीही माझ्याकडे कोल्डप्लेची तिकीटं मागू नका, अशी विनवणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर एका राष्ट्रीय वाहिनीवरून केली आहे.
कोल्डप्ले हा जगभरात नावाजलेला एक म्युझिक बँड आहे. जगभरात यांचे खूप मोठ्या संख्येने चाहते आहेत. महाराष्ट्रात नवी मुंबई येथे जानेवारी २०२५ मध्ये डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्डेडियमवर या बँडचा कार्यक्रम होणार आहे. “म्युझिक ऑफ दी स्फीअर्स वर्ल्ड टूर २०२५” असं या कार्यक्रमाचं नाव आहे. याच्या तिकीटांची ऑनलाईन विक्री सुरू केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात सर्व तिकीटं विकली गेली.
तिकीटांसाठी मोजले ३ ते ५ लाख
या कार्यक्रमाच्या तिकीटासाठी चाहत्यांनी तब्बल ३ लाखांपर्यंतची रक्कम मोजली. तर व्हीआयपी तिकीटांसाठी ५ लाखांहून अधिक रक्कम मोजल्याचं समजतं. दरम्यान, या कार्यक्रमाच्या तिकीटांची काळ्या बाजारात विक्री झाल्याची चर्चा आहे. पोलिसांनी या प्रकरणी काहीजणां विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच ज्या ऑनलाईन संकेतस्थळावरून कोल्डप्लेच्या तिकीटांची विक्री केली जात होती. ते संकेतस्थळही संशयाच्या फेऱ्यात अडकलं आहे. अशातच या कार्यक्रमाचं आयोजन, नवी मुंबईतील वाहतूक व्यवस्था हे येथील सरकारसमोरचं आव्हान आहे. त्यातच सरकारमधील लोकांना या कार्यक्रमाची तिकीटं मिळाली असतील असं काही लोकांना वाटतं. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत उत्तर दिलं आहे.
पाच ठिकाणी कोल्डप्ले झाला तरी..
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कोल्डप्लेचा कार्यक्रम महाराष्ट्रात होतोय. हा असा कार्यक्रम आहे की एकाच वेळी पाच क्रिकेट स्टेडियमवर हा कार्यक्रम आयोजित केला गेला तरी तिकीटं कमी पडतील. महाराष्ट्राचा गृहमंत्री म्हणून माझ्यासमोर अनेक अडचणी आहेत. त्यातच माझ्यासमोर एक नवी अडचण उभी राहिली आहे. काही लोकांना वाटतंय की मी महाराष्ट्राचा गृहमंत्री असल्यामुळे मला या कार्यक्रमाची तिकीटं मिळाली असतील. लोकांना असं वाटतंय ही माझ्या समोरची अडचण आहे. परंतु,मी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवरून लोकांना सांगू इच्छितो की माझा कोल्डप्लेच्या कार्यक्रमाशी काहीच संबंध नाही. मला या कार्यक्रमाची तिकीटं मिळत नाहीत. त्यामुळे कोणीही कोल्डप्लेच्या तिकीटासाठी माझ्यामागे लागू नका”.