लडाखमध्ये आणखी पाच नवे जिल्हे

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, प्रतिनिधी : देशातील सुलभ प्रशासनासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक नवीन निर्णय घेतला आहे. लडाखमध्ये आता आणखी पाच नवीन जिल्हे तयार करण्यात येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज ही घोषणा केली आहे.
लडाख हे जगभरातील पर्यटकांचं आवडतं डेस्टिनेशन आहे. जम्मू – काश्मिरमधील विविध ठिकाणांसह अनेक जण आता लडाखच्या पर्यटनाला आवर्जून प्राधान्य देतात. एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर अमित शहा यांनी घोषणा केली आहे. अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पाठपुराव्यानुसार विकसित आणि समृद्ध लडाख बनवण्याच्या उद्देशाने केंद्रीय गृह मंत्रालयाने लडाख या केंद्रशासित प्रदेशात पाच नवीन जिल्हे निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.
झंस्कर द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग हे नवीन जिल्हे प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रशासनाला बळ देऊन लोकांसाठी असलेले फायदे त्यांच्या दारापर्यंत पोहोचवतील. मोदी सरकार लडाखच्या नागरिकांसाठी मुबलक संधी निर्माण करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही अमित शाह यांनी म्हटले आहे.