मनोज जरांगे यांची शांतता फेरी रविवारी

पिंपरी, प्रतिनिधी : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात येत्या ११ ऑगस्ट रोजी मराठा जनजागृती व शांतता फेरी होणार आहे.
साई संस्कार संस्था, संभाजीनगर येथे नियोजनासंदर्भात मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांची बैठक झाली. यावेळी चर्चा करण्यात आली. पिंपरी- चिंचवडमधून निघणारी फेरी भक्ती- शक्ती चौक निगडी या ठिकाणाहून सुरू होईल. या फेरीमध्ये देहूरोड, मावळ या भागातून येणारे मराठा बांधव भक्ती- शक्ती येथे सहभागी होतील. काळेवाडी, रहाटणी भागातील मराठा बांधव हे पिंपरी चौकात सहभागी होतील. खेड, जुन्नर व चाकण या भागातून येणारे बांधव हे नाशिक फाटा येथे या फेरीमध्ये सहभागी होतील. फेरी एकत्रितपणे भक्ती- शक्ती चौकातून सकाळी नऊ वाजता निघेल. त्यानंतर सव्वानऊ वाजता पिंपरी चौकात आणि साडेनऊ वाजता ही फेरी नाशिकफाटा येथे पोहोचेल. त्यानंतर पुण्यातील सारसबागच्या दिशेने वाटचाल करेल. त्या ठिकाणी दुचाकी वाहनतळ व्यवस्था केली आहे.
असे असेल पुण्यातील नियोजन
पुण्यातील फेरी सकाळी ११ ला निघेल. निघेल. ही फेरी स्वारगेट येथील सारसबाग -बाजीराव रोड, आप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, छत्रपती शिवाजी महाराज पूल , छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, जंगली महाराज रस्ता, बालगंधर्व रंगमंदिर चौक, छत्रपती संभाजी महाराज स्मारक डेक्कन (अलका टॉकीज) या मार्गाने जाईल, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज पिंपरी चिंचवड शहराचे सतीश काळे यांनी दिली .