फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
गुन्हेगारी महाराष्ट्र

अखेर मनोरमा खेडकर यांना अटक

अखेर मनोरमा खेडकर यांना अटक

प्रतिनिधी, पुणे: प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकल्यानंतर आता त्यांच्या कुटुंबाच्या संदर्भातही विविध वादग्रस्त प्रकरणे समोर आली. त्यांच्या आई डॉ. मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील पौड येथे एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकवल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पौड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल केला. अखेर आज पौड पोलिसांनी रायगडमधील एका फार्महाऊसमधून त्यांना ताब्यात घेतले आहे.

चुकीचे प्रमाणपत्र सादर करण्यापासून अनेक विविध वादग्रस्त मुद्दे पुढे येत असताना पूजा खेडकर वादात सापडल्यानंतर त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होऊ लागला. या व्हिडीओमध्ये मनोरमा खेडकर या एका शेतात हातात पिस्तुल घेऊन शेतकऱ्यांना दमदाटी करत असल्याचे दिसत आहे. शिवाय, यावेळी मनोरमा यांच्यासोबत त्यांचे अंगरक्षकदेखील होते. जमिनीच्या मालकीहक्कावरून वाद झाल्यानंतर मनोरमा खेडकर थेट हातात पिस्तुल घेऊन त्या शेतकऱ्यांना धमकावू लागल्या. त्यांच्या आयएएस मुलीचं वर्तन चर्चेचा विषय ठरल्यानंतर त्यांच्या आईचा हा व्हिडीओ चर्चेत आला आहे.

पूजा खेडकर यांनी अंबर दिवा लावलेली ऑडी कार जप्त करण्यासाठी पोलीस कर्मचारी त्यांच्या पुण्यातील घरी गेले असता त्यांच्याशीही मनोरमा खेडकर या अरेरावीने बोलत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर हातात पिस्तुल घेतलेला हा व्हिडीओ व्हायरल झाला. ही घटना घडली, तेव्हा यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र, या व्हिडीओवर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर स्थानिक शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

मनोरमा खेडकर यांनी पिस्तुल का दाखवले?
खेडकर यांनी पिस्तुल का दाखवले याबाबतची पार्श्वभूमी त्यांचे पती दिलीप खेडकर यांनी ‘आज तक’शी बोलताना सांगितली. ते म्हणाले, “माझी पत्नी मनोरमा आमच्या मालकीच्या जमिनीची पाहणी करण्यासाठी गेल्या असता तिथे आठ-दहा लोकांनी पत्नीवर हल्ला केला. त्याबाबत एफआयआर दाखल केलेला आहे. संबंधित शेतकऱ्यांच्या दोन पिढ्याआधीच ती जमीन विकली गेली असून दोन तीन लोकांकडून ती आमच्यापर्यंत आली. त्यानंतरही हे शेतकरी आम्हाला तिथे जाण्यापासून अडवत आहेत. आम्हाला धमकावत आहेत.”

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"