मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील पतीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर, पत्नीची आत्महत्या!

पिंपरी : पिंपरी चिंचवडच्या मोशी येथील कचरा डेपो दुर्घटनेमधील अपघातात मयत झालेल्या नागेश गायकवाड यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. सोनाली नागेश गायकवाड (वय 23) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर एक महिन्याने नागेश गायकवाड यांच्या पत्नीने रात्री उशिरा गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. नागेश गायकवाड यांच्या दुर्घटनेनंतर त्यांच्या पत्नी सोनाली या तणावात होत्या .यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्यापूर्वी कोणतीही सुसाईड नोट आढळली नाही. मात्र कमी वयात पतीला गमावून बसल्याचे दुःख सहन न झाल्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा सुरू आहे. सोनाली गायकवाड यांच्या आत्महत्येमुळे चिमुकल्या श्रेया- प्रियाचं छत्र मात्र हरपले आहे.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेत नऊ जणांचा बळी गेला आहे गेला. महिनाभर केवळ चौकशी सुरू असल्याचे आणि जबाब नोंदवले जात आहेत. एसआयटी नेमलेली आहे असे सांगून पोलीस मुख्य सूत्रधारांना अटकेपासून संरक्षण देत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे .त्यांच्यावर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी अनेक सामाजिक संस्थानी केली आहे. मात्र अजून पर्यंत या अधिकाऱ्यांवर गुन्हा देखील दाखल झाला नाही हे दुर्दैव आहे.

