दोन लाखाचा अपहार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

पिंपरी : आळंदी येथील श्रीहरी गोविंद प्रतिष्ठान संस्थेचे दोन धनादेश वापरून दोन लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दोन सप्टेंबर 2024 ते 1 ऑक्टोबर 2024 या कालावधीत घडली .
याप्रकरणी अनिता भाऊसाहेब कड (वय 64, रा. बाणेर, पुणे) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कीर्ती राजेश सोमाणी (वय 50), राजेश रामेश्वर सोमाणी (वय 55, दोघेही रा. परभणी) आणि कमल किशोर मंत्री (वय 65, कोथरूड, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीहरी गोविंद प्रतिष्ठानने सद्गगुरू रामेश्वर सोमाणी यांच्याकडे आध्यात्मिक प्रचाराची जबाबदारी सोपवली होती. त्यासाठी संस्थेकडून त्यांना नियमित मानधन दिले जात होते. अध्यात्मिक प्रचारासाठी संस्थेने एकत्रित दोन धनादेश दिले होते. दरम्यान रामेश्वर सोमाणी यांचे निधन झाल्यानंतर संबंधित धनादेश आरोपींनी स्वतःकडे ठेवून त्यावरील दोन लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दुधमल, पोलीस उपनिरीक्षक गिरी गोसावी तपास करीत आहेत.

हिंजवडीतील दोन लॉज अँड बारवर पोलिसांची कारवाई!
पिंपरी : विनापरवाना तसेच मुदतीपेक्षा अधिक वेळ दारू व खाद्यपदार्थाची विक्री सुरू ठेवल्याने दोन लॉज आणि बार मालकांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवार 26 जुलै रोजी करण्यात आली.
मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाचे पोलीस गस्तीवर असताना त्यांना विप्रो सर्कल येथील एक लॉज अँड बार तसेच टू सोशल स्ट्रीट येथील इको क्लब अँड बार हे दोन्ही बार मुदतीपेक्षा अधिक वेळ सुरू असल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही आस्थापनावर महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये कारवाई करून खटले दाखल केले आहेत.

