फक्त मुद्द्याचं!

15th June 2026
पिंपरी-चिंचवड

महापालिका सर्वसाधारण सभेत पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांचा महापौरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान!

महापालिका सर्वसाधारण सभेत पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांचा महापौरांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान!

पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उंची देणारे कलासाधक
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कलाकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सुरू केलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आपल्या शहरामध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे अनेक गुणी कलाकार आहेत. अनेकदा अशा कलाकारांचे योगदान समाजापर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचत नाही किंवा त्यांना योग्य वेळी प्रोत्साहन मिळत नाही. अशा परिस्थितीत कलाकारांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा महानगरपालिकेचा प्रयत्न खरोखरच कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमांमुळे कलाकारांना नवसंजीवनी मिळते, तसेच युवा पिढीलाही कलेच्या क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा मिळते, असे मत आंतरराष्ट्रीय कीर्तिचे कथक नर्तक पंडित डॉ. नंदकिशोर कपोते यांनी व्यक्त केले.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिकात आपल्या कार्यकर्तृत्वाने मोलाची भर घालणाऱ्या तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन्मान करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्या धोरणानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत आंतरराष्ट्रीय कीर्तिचे कथक नर्तक डॉ. पंडित नंदकिशोर कपोते यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला, त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, नगरसदस्य अनिल घोलप, अर्चना करांडे, सुलभा उबाळे, प्रा. उत्तम केंदळे, शत्रुघ्न काटे, योगेश बहल, नगरसचिव मुकेश कोळप, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आदी उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना पंडित डॉ. नंदकिशोर कपोते म्हणाले, माझे संपूर्ण बालपण पिंपरी चिंचवडमध्येच गेले. येथील शाळांमध्ये शिक्षण घेत असताना माझ्यामध्ये कलेची आवड निर्माण झाली. विशेषतः नृत्यकलेबद्दल मला लहानपणापासूनच आकर्षण होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज करण्यात आलेला हा सन्मान माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा आणि भावनिक क्षण आहे. ज्या शहरात माझे बालपण गेले, ज्या मातीत मी वाढलो, शिकलो आणि घडलो, त्या पिंपरी चिंचवड शहराकडून मिळालेला हा सन्मान माझ्यासाठी सर्वांत मोठा आणि मोलाचा आहे.
यावेळी मानपत्राचे वाचन विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले .

पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उंची देणारे कलासाधक
डॉ. पंडित नंदकिशोर कपोते यांनी कथक नृत्यकलेच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची मूल्ये जपत पिंपरी चिंचवडच्या सांस्कृतिक विश्वाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख प्राप्त करून देण्यासाठी अत्यंत उल्लेखनीय योगदान दिले आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यपरंपरेतील कथक या अभिजात, समृद्ध आणि तेजस्वी कलावैभवाला आपल्या अद्वितीय प्रतिभा, कठोर साधना आणि संस्कृतीनिष्ठ कार्यातून जागतिक स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे ज्येष्ठ कथक नर्तक, गुरु, संशोधक, लेखक, विचारवंत आणि संस्कृतीचे अभ्यासक म्हणून डॉ. पंडित नंदकिशोर कपोते यांनी भारतीय कला विश्वात अढळ स्थान निर्माण केले आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त करणारे महाराष्ट्रातील पहिले पुरुष कथक नर्तक म्हणून डॉ.कपोते यांनी मानाचे शिखर सर केले. कथक नृत्यकलेतील त्यांच्या असामान्य योगदानाची दखल घेत भारत सरकारने त्यांना संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पुरस्कार या प्रतिष्ठित राष्ट्रीय सन्मानाने गौरवान्वित केले आहे. याशिवाय पुणे आणि निगडी येथे स्थापन केलेल्या नंदकिशोर कल्चरल सोसायटीच्या माध्यमातून डॉ.कपोते यांनी कथक नृत्याचे शिक्षण, संवर्धन आणि प्रचार-प्रसाराचे कार्य सुरू ठेवले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"