विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी प्रलंबित प्रकल्पांची घेतली माहिती!

महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यासमवेत घेतली बैठक
पिंपरी : विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी बैठक घेऊन पिंपरीतील विकासकामांची सद्यस्थिती, प्रशासकीय कामकाज तसेच प्रलंबित प्रकल्पांची प्रगती याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधला.

महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बैठकीदरम्यान त्यांचे स्वागत केले. शहरातील सुरू असलेल्या महत्त्वपूर्ण प्रकल्पांची माहिती तसेच विविध विकासकामांची अंमलबजावणीबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी माहिती दिली.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, नगररचना विभागाचे उपसंचालक किशोर गोखले, उप आयुक्त अण्णा बोदडे, क्षेत्रीय अधिकारी मुकेश कोळप, कार्यकारी अभियंता विजय भोजणे, तसेच महानगरपालिकेतील विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान अण्णा बनसोडे यांनी पिंपरी विधानसभा मतदारसंघासह शहरातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या रस्ते विकास, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, नगररचना, सार्वजनिक सुविधा आणि नागरी पायाभूत सुविधांशी संबंधित कामकाजाचा आढावा घेतला. प्रलंबित कामांना गती देणे, नागरिकांच्या तक्रारींचे तातडीने निराकरण करणे तसेच विकासकामांमध्ये पारदर्शकता राखण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या.
याशिवाय, महानगरपालिकेच्या वतीने सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची सद्यस्थिती, अडचणी व भविष्यातील नियोजन यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांनी संबंधित विषयांवर माहिती देत आवश्यक सुधारणा व उपाययोजनांबाबत विचार मांडले.

