घरगुती वापराच्या सिलेंडर मधून बेकायदेशीरपणे गॅस रिफीलींग!

37 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : घरगुती वापराच्या सिलेंडर मधून गॅस बेकायदेशीरपणे इतर सिलेंडर मध्ये भरत असल्या प्रकरणी चिखली आणि भोसरी येथे दोन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. या कारवाईत पोलिसांनी एकूण सदतीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली, पाटीलनगर येथे केलेल्या कारवाईत मनोज नरेश मिश्रा (वय 55, रा. चिखली, मूळ- रा. बिहार )यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी कोणतीही परवानगी न घेता आवश्यक सुरक्षेची काळजी न घेता घरगुती वापराच्या सिलेंडर मधून इतर सिलेंडर मध्ये गॅस रिफिलिंग करत होता. पोलिसांनी त्याच्या दुकानावर छापा टाकून चार घरगुती गॅस सिलेंडर 13 लहान सिलेंडर असा 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
भोसरी येथील लोंढे अळी परिसरातील महालक्ष्मी गॅस सर्विसिंग या दुकानात दुसरी कारवाई करण्यात आली. गणेश दादाराव कोणाळे (वय 38, रा. चर्होली, मूळ- रा. लातूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .आरोपी घरगुती मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये बेकायदेशीररित्या गॅस भरत होता. तसेच सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या पोलिसांनी त्यांच्याकडून सिलेंडर आणि इतर साहित्य असा अकरा हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.

