पोलीस अधिकारी असल्याचे भासवून 55 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : फसवणुकीच्या उद्देशाने व्हिडिओ कॉल करून पोलीस अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी यांना तुमचे आधार कार्ड मनी लॉन्ड्रींग व ड्रगच्या गुन्ह्यात वापर करण्यात आले असून तुम्हास अटक होणार आहे, अशी भीती घालून दोन बँकांमध्ये अनुक्रमे 39 लाख व 16 लाख असे एकूण 55 लाख रुपये भरण्यास भाग पाडून आर्थिक फसवणूक केली आहे. ही घटना दहा मे ते तीन जून 2026 या कालावधीत एकता कॉलनी, सर्वे नंबर 180, भोसरी येथे घडली.

याप्रकरणी एका व्यक्तीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. टेलिकॉम ऑफिसर दिल्ली, सीबीआय ऑफिसर बाराखंबा पोलीस ठाणे दिल्ली, आय सी आय सी बँक खातेधारक ,सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक करण्याच्या उद्देशाने व्हिडिओ कॉल करून स्वतः पोलीस अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी यांचे आधार कार्ड हे मनी लॉन्ड्रींग व ड्रगच्या गुन्ह्यात वापरले आहे, त्यामुळे फिर्यादीस अटक होणार असल्याचे सांगून अटकेची भीती घातली. फिर्यादीस फसवणुकीमध्ये सहभागी असल्याबाबत आरबीआय बँकेचे लेटर पीडीएफ व्हाट्सअप वर पाठवून स्वतः पोलीस ड्रेसवर असल्याचा व्हिडिओ कॉल करून विश्वास संपादन केला .जबरदस्तीने व अप्रामाणिकपणाने फिर्यादी यांचे अकाउंट वरील रक्कम व्हेरिफाय झाल्यानंतर परत करण्याचा विश्वास देऊन आयसीआयसी बँक अकाउंट वर 39 लाख ,सेंट्रल बँक ऑफ इंडिया खाते क्रमांक वर 16 लाख रुपये असे एकूण 55 लाख रुपये रक्कम भरण्यास भाग पाडून फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आहे. सायबर पोलीस निरीक्षक नाळे हे तपास करत आहेत.

