राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडू तयार करण्याचे रोहिदास कोंडे यांचे स्वप्न यशस्वी : खासदार श्रीरंग बारणे

रोहिदास कोंडे यांना “जीवन गौरव पुरस्कार”
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील शाळांमध्ये क्रीडा धोरण लागू करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करून शहरात राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळाडू तयार करण्याचे कार्य तात्कालीन अतिरिक्त आयुक्त रोहिदास कोंडे यांनी केली आहे. यामुळेच आज शहरात खेळाडू तयार होत असल्याचे मत मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने असोसिएशनचे संस्थापक, कार्याध्यक्ष रोहिदास कोंडे यांना “जीवन गौरव पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी खासदार बारणे बोलत होते. हा सत्कार सोहळा रावेत येथील हॉटेल रामकृष्ण येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास माजी रणजी खेळाडू रियाज बागवान, पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी, सचिव राजू कोतवाल. खजिनदार संजय शिंदे, दिलीप मोहिते आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार बारणे पुढे म्हणाले की पिंपरी चिंचवड महापालिका स्थापन झाल्यानंतर शहरातील परिस्थिती तशी बिकटच होती. शहराचे प्रणेते कैलासवासी अण्णासाहेब मगर यांच्या तालमीत तयार झालेले कोंडे यांनी अतिशय नियोजनबद्ध शहराच्या विकासाला आणि क्रीडा धोरणाला नगरसेवकांच्या संमतीने पाठिंबा देऊन कार्य केले. भविष्यात पिंपरी चिंचवड शहरातून राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आपली प्रतिमा निर्माण करावी या उद्देशानेच शालेय स्तरापासून क्रीडा धोरण राबविण्यात आले. यासाठी शहरात खेळाडूंना लागणाऱ्या प्राथमिक गरजा प्रथम निर्माण करण्यात आल्या. यामध्ये अण्णासाहेब मगर स्टेडियम ,जलतरण तलाव, हॉकी स्टेडियम, गिर्यारोहण पोल, वाचनालय आणि अन्य खेळांसाठी लागणारे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी ही झाले असे बारणे म्हणाले.
वेंगसरकर क्रिकेट अकादमी स्थापन करण्यासाठी देखील त्यांनी आम्हाला सहकार्य केले. त्यांच्याच आशीर्वादाने आज पिंपरी चिंचवड मध्ये क्रिकेट असोसिएशन चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे. यासाठी कोंडे यांनी प्रथम पिंपरी चिंचवडला जिल्हा दर्जा मिळावा यासाठी तत्कालीन मंत्री शरद पवार यांच्यासमोर प्रस्ताव मांडला आणि त्यात त्यांना यश आले. यामुळेच आज पिंपरी चिंचवड मधील खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. याशिवाय त्यांनी मनापासून सामाजिक कार्य देखील केले आहे. अनेकांना मदत करून सहकार्य केले आहे असे बारणे यांनी सांगितले.
जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल रोहिदास कोंडे यांनी पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे आभार मानले . महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पिंपरी चिंचवड मध्ये विकास करणे सोपे नव्हते. शहराला जोडणारे रस्ते कमी होते. शहर एकसंध रहावे म्हणून रस्त्यांची कामे करण्यात आली त्याचाच परिणाम आज पिंपरी चिंचवड शहर भरभराटीला आले आहे असे कोंडे यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड मधील नगरसेवकांनी काही विकास कामे आणि तरुणांचा आत्मविश्र्वास वाढविण्यासाठी शहरात विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी आपल्याला पाठबळ दिले. आज शहरातून अनेक खेळाडू पिंपरी चिंचवडचे नाव उज्वल करत आहेत हेच आपले उद्दिष्ट होते असे कोंडे त्यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड शहर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश शेट्टी यांचे त्यांनी विशेष कौतुक केले..मानपत्राचे वाचन संजय शिंदे यांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॅा. मृदूला महाजन यांनी केले.

