“टाईन रिबेल” कंपनीतील 36 लाख किंमतीच्या स्टोरेज टॅंक चोरीची उकल; सहा आरोपींना अटक!

चाकण : नव्याने उभारत असलेल्या चाकण, सावरदरी येथील ‘टाईने रिबेल’ या बियर कंपनी मधील 36 लाख रुपये किंमतीच्या दहा लहान मोठ्या आकाराच्या बिअर स्टोरेज टाक्या अडीच महिन्यापूर्वी चोरी करण्यात आल्या होत्या. याबाबत तांत्रिक पुराव्याच्या आधारे अज्ञात चोरट्यांचा तपास पोलिसांनी केला असता कंपनीतील एका विश्वासू कामगारासह सहा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी ‘टाईने रिबेल’ कंपनीतील विवेक मारुती खैरे यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 20 फेब्रुवारी ते 30 मार्च 2026 या कालावधीत अज्ञात चोरट्याने चोरी केली असल्याबाबत गुन्हा दाखल झाला होता. तांत्रिक पुरावेच्या आधारे शोध घेण्याचे मोठे कडवे आव्हान पोलिसांसमोर असताना पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 च्या श्रीमती श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. तपास पथकाच्या टीमने घटनास्थळाच्या नजीकचे सुमारे 30 ते 35 कंपन्यांचे दीड महिन्यांच्या कालावधीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज पाहणी करून संशयित क्रेन व ट्रक निश्चित केला. त्याचबरोबर फिर्यादीचे कंपनीतील कामगार, आर्थिक गुंतवणूकदार, भागीदार यांचे वरील संशयाच्या दृष्टीने तपास करण्यात आला.
संशयित म्हणून निश्चित केलेल्या क्रेन व ट्रक वरील चालक आणि फिर्यादीचे कंपनीमधील संशयित यांचे संदर्भाने तांत्रिक तपासात फिर्यादीचे कंपनीतील पूर्वी काम केलेला व फिर्यादीचा विश्वासू कामगार प्रसाद राजळे यांनी सदरची चोरी घडवून आणण्याचे निष्पन्न झाले. उपलब्ध पुरावाच्या आधारे प्रसाद राजळे यांच्याकडे तपास करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्यासह स्टील टाक्या चोरी करून नेणारे व चोरीच्या टाक्या खरेदी करणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या 36 लाख रुपये किंमतीच्या दहा लहान मोठ्या आकाराच्या बियर स्टोरेज टॅंक (टाक्या) कुदळवाडी चिखली व मुंब्रा ठाणे येथून जप्त करण्यात आल्या आहेत.
अटक आरोपींची नावे; प्रसाद विनोद राजळे (वय 29, रा. पिरंगुट, ता. मुळशी), चंदन अर्जुन सिंग (वय 38 ,रिव्हर चौक कुदळवाडी, चिखली), आली अहमद चौधरी (वय 32, रा. कुदळवाडी, चिखल, फिरोज अजगर आली खान (वय 38, रा .मोशी, ता. हवेली), किसनकुमार सुभाषचंद्र गुप्ता (वय 24, रा. कुदळवाडी, चिखली), नियाज मोहम्मद इसराइल (वय 51, रशीद कंपाऊंड, मुंब्रा ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 च्या श्रीमती श्वेता खेडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन कदम, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे, पोलीस अंमलदार राजू कोणकेरी, अमोल बोराटे, विठ्ठल वडेकर ,संतोष काळे, मंगल कदम, गणेश गायकवाड, संतोष वायकर, हरी रणदिवे, सुभाष खंडागळे, साहिल सांडभोर, मंगेश घोलप, समीर महंत यांच्या थकाने सहभाग घेतला.

