फक्त मुद्द्याचं!

8th May 2026
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल ९०.२४ टक्के!

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांचा दहावीचा निकाल ९०.२४ टक्के!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांनी यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले असून महापालिकेच्या १७ माध्यमिक मराठी शाळांचा एकूण निकाल ८८.५९ टक्के लागला आहे. तसेच उर्दू माध्यमाच्या ८ शाळांचा निकाल ९७.८७ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी महापालिकेने राबविलेल्या विविध उपक्रमांना या निकालातून यश मिळाल्याचे दिसून आले आहे.

viara vcc
viara vcc

महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपायुक्त ममता शिंदे तसेच प्रशासन अधिकारी संगीता बांगर यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांचे अभिनंदन केले आहे.

यंदा दहावीच्या परीक्षेसाठी महापालिकेच्या मराठी व उर्दू माध्यमाच्या २५ माध्यमिक शाळांमधून एकूण २ हजार ९२५ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी प्रत्यक्ष परीक्षेला २ हजार ९०९ विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी २ हजार ६२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून १६ विद्यार्थी गैरहजर राहिले. तर २८४ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या निकालामध्ये ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे ९३ विद्यार्थी, ८५ टक्क्यांहून अधिक गुण मिळविणारे ५८ विद्यार्थी असून, ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या १७ इतकी आहे. तसेच २२ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी स्मार्ट क्लासरूम, डिजिटल शिक्षण पद्धती, अनुभवी शिक्षकवर्ग, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, विशेष अतिरिक्त तास, सराव परीक्षा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व प्रयत्नांचे सकारात्मक फलित यंदाच्या निकालातून दिसून आले आहे.

विद्यार्थ्यांनी केलेल्या कठोर परिश्रमासोबतच शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाल्याची भावना शिक्षण विभागाने व्यक्त केली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे महापालिका प्रशासनाकडून अभिनंदन करण्यात आले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांचा केला जाणार सन्मान
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार असून त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे. यामध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण प्राप्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी १ लाख रुपये, ८५ ते ८९.९९ टक्के गुण प्राप्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये, ८० ते ८४.९९ टक्के गुण प्राप्त विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये तसेच दिव्यांग उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी यंदा मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकांनी घेतलेली मेहनत आणि शिक्षण विभागाने राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे हे फलित आहे. आगामी काळातही शिक्षणाची गुणवत्ता अधिक वाढवून विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक वातावरणात सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. – ममता शिंदे, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"