फक्त मुद्द्याचं!

7th May 2026
पिंपरी-चिंचवड

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा; आयुक्त !

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा; आयुक्त !

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मान्सूनपुर्व आढावा बैठक संपन्न
पिंपरी : येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवून आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजनावर भर द्यावा. शहरात पाणी साचणाऱ्या ठिकाणांची ओळख करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात व नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करावीत. पूरप्रवण भागांतील नागरिकांच्या स्थलांतराचे पुर्वनियोजन करावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृहात मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी, सुनिल जावरानी, प्रेरणा सिनकर, अनिल भालसाखळे, मनोज सेठिया, माणिक चव्हाण, उप आयुक्त संदीप खोत, राजेश आगळे, अण्णा बोदडे, सिताराम बहुरे, डॉ. प्रदीप ठेंगल, व्यंकटेश दुर्वास, अतुल पाटील, चेतना केरूरे, ममता शिंदे, सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, अजिंक्य येळे, अमित पंडित, क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, पुजा दुधनाळे, अश्विनी गायकवाड, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य उद्यान अधिक्षक महेश गारगोटे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मुठाळ, शिवाजी चौरे, सुनिल शिंदे, हरविंदरसिंह बन्सल, दमयंती पवार, संतोष दुर्गे, महेश कावळे, समीर दळवी, जाहिरा मोमीन, राजेंद्र जावळे, गणेश राऊत, अभिमान भोसले, बी. पी. लांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल तसेच संबंधित विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व विभागांनी आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा पूर्णपणे सज्ज ठेवून आपत्तीपूर्व सूक्ष्म नियोजन करणे अत्यावश्यक आहे. शहरामध्ये ज्या ठिकाणी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचते, अशा ठिकाणांची तात्काळ ओळख करून तेथे कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच नालेसफाईची सुरू असलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी शहर जलनिकासी सक्षम करावी. याशिवाय, महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये अखंडित विद्युत पुरवठा सुनिश्चित करण्यात यावा, तसेच आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक तेवढे बेड्स राखीव ठेवण्याचे नियोजन करावे. पूरजन्य परिस्थितीमध्ये बाधित नागरिकांसाठी शाळा व इतर निवारा केंद्रांचे नियोजन करून त्या ठिकाणी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध राहतील, याची दक्षता घ्यावी. नदीकाठच्या व पाणी शिरण्याचा धोका असलेल्या भागांतील नागरिकांचे वेळेवर सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे नियोजन करावे.

शहरातील धोकादायक इमारतींची तात्काळ पाहणी करून संबंधितांना नोटीस देण्यात यावी व अशा ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची कार्यवाही करावी. तसेच अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्ज तातडीने काढून टाकावीत. होर्डिंगधारकांसमवेत नियमित बैठकांचे आयोजन करून नियमांची माहिती द्यावी व नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तात्काळ मदत मिळावी यासाठी ‘क्विक रिस्पॉन्स टीम’ कार्यरत ठेवण्यात याव्यात. या पथकांमध्ये आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, आरोग्य, विद्युत, स्थापत्य व उद्यान विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश असावा. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून कार्य करावे, तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रभागातील आपत्कालीन यंत्रणा सक्षम ठेवावी.

पावसाळ्यात साथीचे रोग पसरू नयेत यासाठी आरोग्य विभागामार्फत नियमित साफसफाई, निर्जंतुकीकरण व धुरीकरण करण्यात यावे. शहरात स्वच्छ पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. झाडपडीच्या घटनांवर लक्ष ठेवून अशा घटना घडल्यास तात्काळ झाडांच्या फांद्या हटवून वाहतूक सुरळीत ठेवावी. तसेच रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वी बुजवून नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घ्यावी. पाणी साचणाऱ्या ठिकाणी पर्यायी मार्गांची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी. याव्यतिरिक्त, नदीपात्राजवळील धोकादायक अतिक्रमणे ओळखून ती तातडीने हटवावीत. रस्त्यांवर सुरू असलेल्या स्थापत्य कामांदरम्यान योग्य बॅरिकेडिंग करणे बंधनकारक आहे. शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा तपासून नादुरुस्त कॅमेरे दुरुस्त करावेत व मध्यवर्ती पूरनियंत्रण कक्षामार्फत सातत्याने देखरेख ठेवावी. पावसाळ्यात नागरिकांना सतर्क करण्यासाठी सूचना फलक दर्शनी ठिकाणी लावावेत, अशा स्पष्ट सूचना आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिल्या.

बैठकीदरम्यान, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी मान्सूनपुर्व काळात आणि आपत्कालीन परिस्थितीत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"