भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. रोहन खवटे!

दि. २३ व २४ मे रोजी केडगाव (चौफुला) येथे संमेलन
दौंड : राज्यस्तरीय पाचव्या भीमथडी मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी डॉ. रोहन खवटे यांची निवड करण्यात आली आहे. हे साहित्य संमेलन दौंड तालुक्यातील केडगाव (चौफुला) येथे दि. २३ व २४ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

या साहित्य संमेलनात उद्घाटन समारंभ, पुरस्कार वितरण सोहळा, ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कथाकथन, नाट्यप्रयोग, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच कविसंमेलन असे विविध भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
डॉ. रोहन खवटे हे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ असून, दौंड तालुक्यातील सामाजिक कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांनी आजपर्यंत सुमारे ५० हजारांहून अधिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत. विविध आरोग्य शिबिरांद्वारे त्यांनी अनेकांना मार्गदर्शन व उपचार दिले आहेत. तसेच शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे मोलाचे योगदान असून युवकांना मार्गदर्शन करून समाज सशक्त करण्याचे कार्य ते करीत आहेत. दौंड तालुक्याच्या इतिहासात दहावीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणारा पहिला विद्यार्थी, पुणे जिल्ह्यात दुसरा व राज्यात १९ वा क्रमांक त्यांनी पटकवला होता. याशिवाय ते मॅरेथॉन स्पर्धांमध्येही सक्रिय असून लडाख, दिल्ली, मुंबई, पुणे, सातारा व दुबई येथे झालेल्या स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. २५० पेक्षा जास्त राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे पुणे जिल्ह्यातील ते एकमेव आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संशोधन परिषद व भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठान यांच्या वतीने दरवर्षी या संमेलनाचे आयोजन करण्यात येते.
या संदर्भात आयोजित बैठकीस भीमथडी मराठी साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सोनवणे, उपाध्यक्ष बाळासाहेब मुळीक, सचिव दिपक पवार, सदस्य कैलास शेलार, राजाभाऊ जगताप, रामचंद्र नातू, महाराष्ट्र राज्य तमाशा थिएटर मालक संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोकराव जाधव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक कांबळे, झोपडपट्टी सुरक्षा दल पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय डाडर, रानकवी जगदीश वनशिव, भाऊसाहेब फडके, नितिन भागवत, आनंदा बारवकर, सुशांत जगताप, अरविंद जगताप आदी उपस्थित होते.

