१ मे महाराष्ट्राच्या जिद्दीची,संघर्षशीलतेची आणि आत्मविश्वासाची ओळख : महापौर रवि लांडगे

महानगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पिंपरी : ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ ही केवळ ओळ नाही, तर महाराष्ट्राच्या जिद्दीची, संघर्षशीलतेची आणि आत्मविश्वासाची ओळख आहे. या भूमीने प्रतिकूलतेतही उभे राहण्याची तसेच विकास घडवण्याची प्रेरणा दिली. आज महाराष्ट्राच्या स्थापना दिनानिमित्त, आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त तसेच मराठी राजभाषा दिनानिमित्त आपण या समृद्ध परंपरेला वंदन करत असताना, कष्टकरी हातांच्या योगदानाबरोबरच आपल्या मराठी भाषेच्या अभिमानाची जाणीव अधिक दृढ होते. हीच भाषा आपल्या संस्कृतीची ओळख, विचारांची ताकद आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा कणा आहे, असे प्रतिपादन महापौर रवि लांडगे यांनी केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६७ वा वर्धापन दिन तसेच कामगार दिन आणि मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनाच्या प्रांगणात महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते ध्वजारोहन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी शहरवासीयांना महाराष्ट्र दिन, कामगार दिन तसेच मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा देताना ते बोलत होते.
यावेळी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह नगरसदस्य डॉ. सुहास कांबळे, निलेश तरस, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, सह आयुक्त मनोज लोणकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सह शहर अभियंता सुनील बागवानी, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, उप आयुक्त पंकज पाटील, संदीप खोत, अण्णा बोदडे, ममता शिंदे, प्रदीप ठेंगल, व्यंकटेश दुर्वास, तसेच नागरिक उपस्थित होते.
महापौर रवि लांडगे म्हणाले, पिंपरी चिंचवड हे केवळ शहर नाही, तर ते भक्ती-शक्ती, पराक्रम आणि श्रम यांच्या संगमातून घडलेली ओळख आहे. भक्ती शक्ती समूहशिल्पातून प्रकट होणारी प्रेरणा, मोरया गोसावींच्या पावन स्मृती, तसेच संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी तसेच चिंचवड येथील चापेकर बंधूंचे स्मारक आणि त्यांचा ऐतिहासिक वाडा हा स्वातंत्र्यलढ्यातील त्याग, शौर्य आणि क्रांतीची जाज्वल्य साक्ष आहे. हजारो कामगारांच्या कष्टातून उभी राहिलेली औद्योगिक नगरी ही या शहराची खरी ताकद आहे, जिथे प्रत्येक कारखान्यात आणि प्रत्येक कष्टकरी हातात महाराष्ट्राच्या प्रगतीची धडधड जाणवते.

