फक्त मुद्द्याचं!

1st May 2026
पुणे

हिंजवडी पुन्हा तुंबली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार!

हिंजवडी पुन्हा तुंबली तर अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार!

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांचा स्पष्ट इशारा
आयटी पार्कमधील नालेसफाईसाठी ३१ मेची ‘डेडलाईन’
नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरणाचे पीएमआरडीएसह एमआयडीसी व ग्रामपंचायतींना निर्देश
पुणे : पावसाळ्यात हिंजवडी आयटी पार्क आणि परिसरात पाणी साचल्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस आता थेट संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे. नियोजनाअभावी पाणी साचल्यास किंवा कोणतीही आपत्ती ओढवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर ‘आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत’ जबाबदारी निश्चित केली जाईल, असा इशारा पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिला आहे.

vcc maharastra din
vcc maharastra din

आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयात बुधवारी (२९ एप्रिल) आयोजित पावसाळापूर्व आपत्ती व्यवस्थापन बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी ३१ मे २०२६ पूर्वी सर्व कामे पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. हिंजवडी आणि माण आयटी पार्क परिसरात दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होतो. हा प्रश्न सोडवण्यासाठी केवळ बैठका नकोत, तर प्रत्यक्ष अंमलबजावणी हवी, असे स्पष्ट करत महानगर आयुक्तांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), एमआयडीसी, पीएमआरडीए, संबंधित ग्रामपंचायती आणि पाटबंधारे विभाग यांना समन्वयाने काम करण्याचे आदेश दिले. प्रमुख नाले आणि आयटी पार्कमधील अंतर्गत रस्त्यांवरील पाण्याचा निचरा करण्यासाठी एकमेकांवर जबाबदारी न ढकलण्याबाबत त्यांनी बजावले.

पावसाळापूर्व कामांचा आढावा घेताना महानगर आयुक्तांनी महत्त्वाचे निर्देश दिले. त्यात हिंजवडी-माण परिसरातील मुख्य नाले तातडीने मोकळे करून त्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करावे, नाल्यांच्या प्रवाहात अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे ३१ मेपूर्वी हटवावीत, तसेच नाल्यांच्या नैसर्गिक प्रवाहातून येणाऱ्या पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी पीएमआरडीएसह एमआयडीसी व संबंधित ग्रामपंचायतींनी विशेष खबरदारी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस शाखेने सुचवलेल्या उपाययोजना राबवण्याचे बैठकीत ठरले. यावेळी हिंजवडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे यांनी आयटी पार्क परिसरातील ‘ब्लॅक स्पॉट्स’ आणि पाणी साचणाऱ्या ठिकाणांची माहिती सादर केली.

“पावसाळापूर्व कामांमध्ये कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. ३१ मेपर्यंत सर्व कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. जर तांत्रिक त्रुटींमुळे किंवा नियोजनाअभावी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले किंवा जीवितहानी झाली, तर संबंधित विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई निश्चित केली जाईल.” — डॉ. अभिजीत चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

या बैठकीला पीएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त के. मंजुलक्ष्मी, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, सहआयुक्त पूनम मेहता, पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील, हिंजवडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वाहतूक) राहुल सोनवणे, एमआयडीसीचे मुख्य अभियंता कालिदास भांडेकर, अधीक्षक अभियंता निलेश मोढवे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता डी. एम. दुबल यांच्यासह जिल्हा परिषद, वन विभाग आणि एनएचएआयचे वरिष्ठ अधिकारी तसेच हिंजवडी व माण येथील ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"