टेलीग्रामवर अमिष दाखवून एका महिलेची 24 लाख रुपयांची फसवणूक!

पिंपरी : मेघा इंडिया लिमिटेड कडून पैसे कमावण्याचे टेलीग्रामवर अमिष दाखवून एका महिलेची 24 लाख 28 हजार 987 रुपयांची फसवणूक केली .ही घटना 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025 या कालावधीत अनमोल रेसिडेन्सी, काळेवाडी फाटा ,कस्पटेवस्ती रोड, वाकड या ठिकाणी घडली.

याप्रकरणी एका 47 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शमिका, लायला शर्मा, रजत बाळकृष्णन (पूर्ण नाव पत्ता व वय माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांना व्हाट्सअप वरून एच आर मेगा इंडिया लिमिटेड कडून पैसे कमावण्याचे अमिष दाखवण्यात आले. त्यानंतर टेलीग्रामवर आरोपी क्रमांक दोन व तीन यांनी टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली वेळोवेळी रक्कम भरण्यास प्रवृत्त केले. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून विविध बँक खात्यावर एकूण 24 लाख 28 हजार 987 रुपये पाठविले .नंतर आणखी 23 लाख रुपये भरण्याची मागणी झाल्यावर फिर्यादीस आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. संगणकीय साधनांचा वापर करून आर्थिक फसवणूक केली आहे. फिर्यादी यांनी तीन नोव्हेंबर 2025 रोजी ऑनलाईन तक्रार नोंदवली आहे. वाकड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पाटील (गुन्हे) हे तपास करत आहेत.

