फक्त मुद्द्याचं!

13th April 2026
कला साहित्य

भविष्यातही समाजप्रबोधनाचे कार्य जोमाने सुरू ठेवणार : शाहीर राजेंद्र कांबळे

भविष्यातही समाजप्रबोधनाचे कार्य जोमाने सुरू ठेवणार : शाहीर राजेंद्र कांबळे

शाहीर कांबळे यांचा महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान
पिंपरी : गेल्या चार दशकांहून अधिक काळ मी शाहिरीच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन समाजप्रबोधनाचे कार्य करत आहे. महात्मा फुले, शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्याचे काम ही केवळ कला नसून सामाजिक जबाबदारी असल्याची जाणीव मला सतत प्रेरणा देत आली आहे. माझ्यासारख्या विविध भागांत जाऊन लोकजागृती करणाऱ्या शाहिराचा सन्मान करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कलाकारांना दिलेला मान अधोरेखित केला असल्याचे शाहीर राजेंद्र कांबळे म्हणाले. तसेच भविष्यातही समाजप्रबोधनाचे हे कार्य अधिक जोमाने सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आयोजित सामाजिक समता सप्ताह व विचार प्रबोधन पर्व २०२६ या उपक्रमाचा आज उत्साहात प्रारंभ झाला. या पर्वाच्या उद्घाटनप्रसंगी प्रज्ञावंत शाहीर राजेंद्र कांबळे यांना मानपत्र देऊन महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले, त्यावेळी मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

यावेळी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य अँड. गोरक्ष लोखंडे, शिक्षण समिती सभापती रविना अंगोळकर, नगरसदस्या अनुराधा गोरखे, शकुंतला धराडे, सुप्रिया चांदगुडे, नगरसदस्य धर्मपाल तंतरपाळे, कुशाग्र कदम, माजी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

शाहीर राजेंद्र कांबळे यांनी चार दशकांहून अधिक काळ शाहिरीच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या ओजस्वी सादरीकरणातून शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभावी संदेश समाजमनात पोहोचत असून त्यांच्या पोवाड्यांनी समाजजागृतीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

प्रबोधन पर्वाच्या सकाळच्या सत्रात विविध सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे सादरीकरण
प्रबोधन पर्वाच्या पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची रंगतदार मेजवानी पार पडली. शारदा मुंडे यांच्या ‘मी जोतीबाची सावित्री’ या एकपात्री नाट्यप्रयोगातून सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी जीवनप्रवासाचे प्रभावी चित्रण साकारण्यात आले.

साधना मेश्राम व मंजुषा शिंदे यांच्या गीत गायनाच्या मैफिल, महात्मा फुले लिखित ‘तृतीय रत्न’ या नाटकातून अंधश्रद्धा, सामाजिक अन्याय आणि शिक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले. काव्यभूमी संस्थेच्या ‘गाथा साऊ जोतीची..’ या कवितामय कार्यक्रमातून महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव काव्यरूपाने सादर करण्यात आला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"