406 कोटी खर्चाच्या कामांचा समावेश करुन स्थायी समितीने केला अर्थसंकल्प मंजूर!

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तांनी सादर केलेल्या 2026 -27 च्याअर्थसंकल्पात स्थायी समितीने सोमवारी झालेल्या विशेष सभेत तब्बल अडीचशे उप सूचनांसह 406 कोटी खर्चाच्या कामांचा समावेश करून अर्थसंकल्प मंजूर केला आहे .

यामध्ये पवना बंद जलवाहिनी पवना नदी सुधार प्रकल्पासह आवश्यक कामांचा अर्थसंकल्पात समावेश करून निधी उपलब्ध करून दिला आहे. हा अर्थसंकल्प 24 मार्च रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर केला जाणार आहे. स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी अभिषेक बारणे होते. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्थायी समितीला सादर केलेल्या मूळ अंदाजपत्रकात 5 हजार 660 कोटी 72 लाख वकेंद्र व राज्य शासनाचे अनुदान धरून 9 हजार 322 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात 95 टक्के रक्कम अपूर्ण कामांसाठी राखून ठेवले होते. केवळ 5% रक्कम नवीन प्रकल्पासाठी प्रस्तावित आहे .
महापालिकेच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी बांधकाम परवानगी, आकाशचिन्ह व परवाना कर संकलन आणि पाणीपट्टीच्या माध्यमातून सुमारे साडेतीनशे ते चारशे कोटींचे अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी सांगितले , याशिवाय जाहिरात विभागाच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या जाहिरात होर्डिंग्स दर हे विभागानुसार निश्चित केले जाणार आहेत .मागील तीन ते चार वर्षांपासून प्रलंबित असलेला होर्डिंग दरांचा प्रश्न मार्गी लावत भागानुसार दरवाढ लागू केल्यास महापालिकेच्या उत्पन्नात मोठी भर पडणार आहे .
महापालिकेचे मोकळे भूखंड व गाळे भाड्याने देताना त्यांचे दर कमी करून त्यातून अधिक उत्पन्न मिळवण्याचे धोरण निश्चित केले आहे. मोकळ्या जागेवर पे अँड पार्क योजना सुरू करून सर्व पार्किंग महापालिका स्वतः चालवील असे बारणे यांनी सांगितले . पवना बंद जलवाहिनी प्रकल्पासाठी फक्त 40 कोटी रुपये ,पावना नदी सुधार योजनेसाठी 15 कोटी रुपयांची विशेष तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे . तसेच ड्रेनेज लाईनच्या कामांना विशेष प्राधान्य दिले आहे.
नगरसेवकांच्या मागणीनुसार आवश्यक कामांसाठी लेखाशीर्ष उघडण्यात आले आहे. प्रत्येक नगरसेवकांसाठी त्यांच्या प्रभागातील विकास कामे करण्यासाठी दहा लाख रुपयांचा निधी प्रस्तावित आहे .शहरातील विविध प्रभागातील विकास कामांसाठी नगरसेवकांकडून आलेल्या 250 उप सूचनांचा विचार करून अर्थसंकल्पात आवश्यक बदल करण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले. शहराच्या हितासाठी मोठ्या प्रकल्पांसाठी गरज पडल्यास 1500 कोटी रुपयांपर्यंतच्या सर्वसाधारण ठेवींचा वापर करण्याचा निर्णय महापालिका सभेच्या मान्यतेने घेतला जाईल .महापालिकेच्या एकूण पाच हजार पाचशे कोटींच्या ठेवी आहेत.

