फक्त मुद्द्याचं!

14th March 2026
पिंपरी-चिंचवड

निधीअभावी दररोज पाणीपुरवठा नाही हे सांगणे दुर्दैवी, स्वच्छ नियमित पाण्याचे भाजपचे आश्वासन!

निधीअभावी दररोज पाणीपुरवठा नाही हे सांगणे दुर्दैवी, स्वच्छ नियमित पाण्याचे भाजपचे आश्वासन!

पवना जलवाहिनीवरून राहुल कलाटे सभागृहात आक्रमक
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा १३ मार्च २०२६ रोजी पार पडली. महिन्याभरानंतर महापालिकेची सर्वसाधारण सभा होत असताना, या कालावधीत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर ठोस कृती काय झाली? याबद्दल प्रशासनाने नेमके उत्तर द्यावे यासाठी भाजपचे नगरसेवक राहुल कलाटे आक्रमक झाले. स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी शहरातील वाकड, ताथवडे, पुनावळेसह रावेत पम्पिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा होत असलेल्या भागाला नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा होण्यासाठी पवना जलवाहिनीच्या कामाला निधीसह तात्काळ गती देण्यात यावी, अशी आग्रही मागणी राहुल कलाटे यांनी यावेळी केली.

viara vcc
viara vcc

पाण्यासाठी निधी अभावाचे कारण सांगणे दुर्दैवी असून, स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा होणे हा नागरिकांचा अधिकार आहे. भाजपने सत्तेत येताना पिंपरी चिंचवडकरांना नियमित पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिले असून, ते पूर्ण झालेच पाहिजे, असे म्हणत कलाटे यांनी सभागृहात पवना जलवाहिनीचे काम पूर्ण करण्याबद्दल आक्रमक भूमिका मांडली.

शुक्रवारी (१३ मार्च) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटी योजना आढावा, दररोजचे पाणीपुरवठा नियोजन, कचरा व्यवस्थापन अशा महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी भाजपचे नगरसेवक राहुल कलाटे बोलत होते.

पिंपरी चिंचवडसाठी आवश्यक पवना जलवाहिनी प्रकल्प
निधी अभावी पवना जलवाहिनी प्रकल्प पुढे ढकलताना प्रशासनाला हे समजून घ्यावे लागेल की प्रकल्पाला विलंब होईल तसा त्याचा खर्च देखील वाढतच जाणार आहे. त्यामुळे यावर तातडीने कार्यवाही आवश्यक आहे. पवना जलवाहिनी प्रकल्पाला गती देण्याची आवश्यकता आहे. १५ वर्षांपासून ते काम ठप्प आहे. आत्तापर्यंत तब्बल २०० कोटी रुपये खर्च झाले असून, एकूण चारशे कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचा खर्च आत्ता तब्बल १२५६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, तरीही हा प्रकल्प कागदावरच आहे. पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना नियमित पाणीपुरवठ्याचे भाजपने आश्वासन दिले आहे. ते पूर्ण करणे आपले आद्य कर्तव्य आहे, असेही कलाटे यावेळी म्हणाले.

पाण्याच्या प्रश्नावर सभागृहाचे लक्ष वेधून घेत कलाटे पुढे म्हणाले, “शहरातील अनेक भागांत पाणीटंचाईच्या तक्रारी कायम आहेत. उन्हाळ्यात त्यात मोठी वाढ होते. पवना धरणातून सोडलेले पाणी रावेत येथील पवना नदीच्या बंधार्‍यातून उचलले जाते. ते शुद्ध करुन संपूर्ण शहराला पुरविले जाते. महापौरांनी यापूर्वी जलशुद्दीकरण केंद्राला भेट दिली. महिन्याभरात त्यावर पुढे काय कार्यवाही झाली यावर स्पष्टता देण्यात यावी. रावेत पंपिंग स्टेशन इथे पवना नदी पात्रातील पाण्याचा दर्जा खालावत आहे. त्यासाठी २० लाख रुपये देऊन महापालिकेने नेमलेल्या संस्थेमार्फत नेमके काय काम केले जाईल? याबद्दलही स्पष्टता देण्यात यावी, अशी मागणी कलाटे यांनी यावेळी केली.

स्मार्ट सिटी योजनेबद्दल मांडणी करतांना कलाटे म्हणाले की, “सभागृहातील सदस्यांनी मूल्यमापन करताना या योजनेचा आवाका समजून घेतला पाहिजे. पायाभूत सुविधा उभारण्यासाठी या योजनेत फक्त पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर या दोनच गावांचा समावेश होता. त्यामुळे प्रत्यक्ष कामे फक्त या भागापुरती मर्यादित राहिली, मात्र काही “स्मार्ट प्रकल्प” यानिमित्ताने सुरु झाले ज्यांचा उपयोग संपूर्ण शहराला होऊ शकेल. यापैकीच एक म्हणजे “सीसीटीव्ही कॅमेरे” बसवणे. शहराच्या सुरक्षिततेसाठी हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. मात्र ठेकेदाराने बसवलेले किती सीसीटीव्ही कॅमेरे आज सुस्थितीत आहेत याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे ठेकेदाराला याच्या देखभाल दुरुस्तीसाठी जबाबदार धरून काम करून घेणे आवश्यक आहे, असेही कलाटे म्हणाले. तसेच या योजनेअंतर्गत येणाऱ्या सर्व उर्वरित कामांचे उत्तरदायित्व निश्चित केले पाहिजे, असेही कलाटे यांनी यावेळी सुचवले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"