फक्त मुद्द्याचं!

21st February 2026
महाराष्ट्र

राज्यपाल आणि उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सन्मान!

राज्यपाल आणि उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सन्मान!

माझी वसुंधरा अभियानात सलग तिसऱ्यांदा राज्यात अव्वल,महापालिकेस १० कोटीचे बक्षिस
हा सन्मान पिंपरी चिंचवड शहरवासियांचा-महापौर रवि लांडगे
*पिंपरी : पर्यावरण संवर्धन, शाश्वत विकास आणि हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केल्याबद्दल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावत सलग तिसऱ्यांदा अव्वल स्थान मिळविले आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महापालिकेस १० कोटीचे बक्षिस जाहिर झाले असून आज राज्यस्तरीय आयोजीत सन्मान सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत व उप मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते महापौर रवि लांडगे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

vcc 5
vcc 5
 यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज,महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक आदी उपस्थित होते.

 १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व हवामान बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ च्या राज्यस्तरीय अंतिम निकालात, १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या गटामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रथम क्रमांक मिळवित सलग तिसऱ्यांदा राज्यात अव्वल येण्याची किमया साधली.

 ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ अंतर्गत भूमी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचमहाभूतांवर आधारित विविध पर्यावरणीय निकषांवर शहरांची कामगिरी तपासण्यात आली. या निकषांमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने घनकचरा व्यवस्थापन, स्त्रोतस्थानी कचरा विलगीकरण, निर्माल्य पुनर्प्रक्रिया प्रकल्प, एकल-वापर प्लास्टिकमुक्त मोहीम, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जलसंधारण उपक्रम, सौरऊर्जा वापर तसेच हरित पट्टा विस्तार या क्षेत्रांत प्रभावी अंमलबजावणी केली.

 शहरातील पर्यावरणीय गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा घडवून आणताना प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आणि व्यापक जनसहभागाला विशेष प्राधान्य दिले.

 सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळविणे ही पिंपरी चिंचवड शहराच्या शाश्वत, नियोजनबद्ध आणि पायाभूत पर्यावरणीय प्रगतीची ठोस साक्ष आहे. या यशामुळे शहर राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी प्रेरणादायी ठरले असून, भविष्यात अधिक नाविन्यपूर्ण, तंत्रज्ञानाधारित आणि शाश्वत उपक्रम राबवून हरित, स्वच्छ व पर्यावरणपूरक शहर घडविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत सलग तिसऱ्यांदा राज्यात प्रथम क्रमांक मिळविणे हा संपूर्ण पिंपरी चिंचवडकरांसाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात शहराने सातत्यपूर्ण, नियोजनबद्ध आणि परिणामकारक कामगिरी करत राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. हे यश केवळ महापालिकेचे नसून शहरातील नगरसदस्य, नगरसदस्या, नागरिक, स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालये, उद्योग क्षेत्र आणि सर्व घटकांच्या सक्रिय सहभागाचे फलित आहे. – रवि लांडगे महापौर पिंपरी चिंचवड महानगरपालिका

शाश्वत विकासाच्या दिशेने शहराची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे. तंत्रज्ञानाधारित व्यवस्थापन, पारदर्शक अंमलबजावणी आणि जनसहभाग यांच्या माध्यमातून आम्ही पर्यावरणीय निकषांमध्ये उल्लेखनीय सुधारणा साधली आहे. भविष्यातही हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्याचा आमचा निर्धार कायम राहील.- श्रावण हर्डीकर आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"