पाच किलो 98 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त: एकास अटक!

पिंपरी : बेकायदेशीर रित्या दोन लाख 55 हजार रुपये किमतीचा पाच किलो 98 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा विक्री करण्यासाठी ताब्यात ठेवल्याने एका व्यक्तीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवार दोन जानेवारी रोजी 11:15 वाजण्याच्या सुमारास निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील राजुरी स्टील दुकानासमोर, बंद बीआरटी रोडवर करण्यात आली.
रणधीर रमेश माने पोलीस शिपाई अमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. संजू गिरधारी तावडे (वय 52, रा. अण्णाभाऊ साठे चौक, अशोक नगर, जि. अकोला) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे .आरोपी याने दोन लाख 55 हजार रुपये किमतीचा पाच किलो 98 ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीररित्या विक्री करण्याकरिता जवळ बाळगल्याने कारवाई करण्यात आली. निगडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धुमाळ हे तपास करत आहेत.

एटीएम कार्डद्वारे 26 हजाराची फसवणूक!
पिंपरी : अल्पवयीन मुलाची दिशाभूल करून अनोळखी चोरट्याने एटीएम द्वारे पैसे काढून 25 हजार 900 रुपयांची फसवणूक केली. ही घटना बुधवार 31 डिसेंबर रोजी रात्री मोशी येथील टोलनाक्या जवळील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मध्ये घडली. या प्रकरणी अनोळखी चोरटा आणि हेल्पलाइन वरील अज्ञात व्यक्ती यांच्या विरोधात गुरुवार एक जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी लोखंडे वस्ती, चिंबळी गाव, ता. खेड जि. पुणे येथील एका 17 वर्षीय मुलाने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी मुलगा बुधवारी रात्री आठच्या सुमारास मोशी टोलनाक्याजवळील एचडीएफसी एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचे एटीएम कार्ड मशीन मध्ये अडकले. त्यावेळी पाठीमागे उभे असलेल्या अनोळखी इसमाने त्याची दिशाभूल करून जवळच्या एटीएम मधील वॉचमन कार्ड काढून देईल असे सांगितले. एटीएम वर चिटकवलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर फिर्यादीने संपर्क साधला असता समोरील व्यक्तीने स्वतःला बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवले आणि पिन नंबर टाकण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या आईच्या खात्यातील 25 हजार 900 रुपये काढून फसवणूक करण्यात आली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

