मुग्धा- प्रथमेश जोडीची ‘मर्मबंधातली ठेव’ मोरयाभक्तांच्या हृदयाच्या मखमली पेटीत जतन!

महासाधू मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळा
चिंचवड : महासाधू मोरया गोसावी यांच्या 464 व्या संजीवन समाधी सोहळा महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित उत्सवात दुसऱ्या दिवशी सारेगमप लिटल चॅम्प्स पहिल्या पर्वाची लाडकी जोडी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन या जोडीने आपल्या ‘मर्मबंधातली ठेव’ या संगीत रजनीच्या कार्यक्रमाने शब्दश: मंत्रमुग्ध केले.

लग्नानंतर प्रथमच चिंचवडमध्ये आलेल्या या जोडीला काल डोळे भरून पाहण्यासाठी आणि कानात त्यांचे दैवी सप्तसुरु साठवण्यासाठी मोरया मंदिर परिसरात विक्रमी गर्दी झाली होती. या जोडीने आपल्या सुरेल गायनाने खरोखरचं मंत्रमुग्ध केले, खिळवून ठेवले. आबालवृद्ध या कार्यक्रमात एकाच जागी शेवटच्या गाण्यापर्यंत बसून होते. याहून अधिक योग्य वर्णन या कार्यक्रमाचे होऊच शकत नाही. श्रीराम भजनाने सुरुवात झालेल्या या संगीत रजनीत या भजनाच्या अंतिम कडव्यात प्रथमेशने उपस्थित श्रोत्यांना ठेका धरायला लावला आणि हा सूर शेवटपर्यंत म्हणजेच ‘अवघा रंग एक झाला’ या भैरवी पर्यंत.
प्रभो विघ्नहर्ता, तुज मागतो मी आता, जय शंकरा करुणाकरा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, सोहम हर डमरू बाजे, हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, काळ देहासी आला खाऊ अशा एकापेक्षा एक अजरामर गाण्यांची ही मैफल रसिकांच्या मनात चिरकाल वसणार यात काहीच शंका नाही.
याच मैफलीतली एक विशेष बाब म्हणजे प्रथमेशने राधास्वामी लक्ष्मीरमणा हे कानडी भजन गायला सुरुवात केली आणि ही भाषा समजत नसताना देखील अनेक रसिकांनी मनापासून ताल धरला , या अवीट मैफलीचे निवेदन विघ्नेश जोशी यांनी यथार्थ करत आपली अवीट छाप पाडली. तबल्यावर रुपक वझे, हार्मोनियमवर स्वानंद कुलकर्णी, व्हायोलीनवर उदय गोखले तर पखवाजाची साथ प्रथमेश देवधर यांच्यासह ताल व टाळ याची साथ विश्वास कळमकर या सहकलाकारांनी अप्रतिमरित्या देत हा कार्यक्रम खूपच उंचीवर नेला.
अशा मैफली कधीच संपू नयेत असे भाबड्या मनाला वाटत असले तरी जे वाटते तेच होते असे नसते ना, त्यामुळेच ही मैफिल मनात साठवत श्रोते महोत्सव आयोजकांना मनोमन धन्यवाद देत घरी परतले.
आजच्या या संगीत रजनीसाठी सुद्धा चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त जितेंद्र देव, केशव विद्वांस, ॲड. देवराज डहाळे हे रसिक म्हणून तसेच यजमान म्हणून संपूर्ण वेळ कार्यक्रमात उपस्थित होते. त्यांच्याच हस्ते कलाकारांचा सन्मान केला गेला.

