सामाजिक कार्याचे अमीष दाखवून दोन कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक!

सहा जणांविरोधात गुन्हा दाखल ; दोन जणांना अटक
पिंपरी : सामाजिक कार्याची संधी आणि 112 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीवर मोठा परतावा देण्याचे अमीष दाखवून एका 59 वर्षीय व्यक्तीची 2 कोटी 65 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे . ही घटना जुलै ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोशी परिसरात घडली. याप्रकरणी एका 59 वर्षीय व्यक्तीने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांना सामाजिक कार्याची संधी देऊ असे सांगितले .एका आरोपीच्या 112 कोटी रुपयांच्या फिक्स्ड डिपॉझिट वर मिळणारे व्याज वापरण्यास मिळेल असे अमीष दाखवले. यासाठी तीन कोटी रुपयांपैकी दोन कोटी साठ लाख रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले .
आरोपींनी फिर्यादी सोबत बनावट करारनामा ,बनावट आधार कार्ड ,पॅन कार्ड आणि बनावट डिमांड ड्राफ्टचा वापर करून फसवणूक केली. त्यांनी फिर्यादीचे दोन कोटी 65 लाख रुपये परत न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी अजय राजाराम खडके (कोल्हापूर) आणि अॅड. सोमनाथ कदम (निगडी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस याबाबत तपास करीत आहे.

