सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान खपून घेणार नाही

स्वारगेटमधील घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी (वृत्तसंस्था) : पुण्यात राज्य परिवहन बसमध्ये एका तरूणीवर झालेल्या बलात्कारानंतर सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी दिला आहे. अशा प्रकारच्या घटनांनंतर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान खपवून घेणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
स्वारगेट बस आगारात बंद पडून असलेल्या एका शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरूणीवर मंगळवारी पहाटे बलात्कार करण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी, स्थानिक शिवसेना (यूबीटी) नेते वसंत मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध करण्यासाठी स्वारगेट बस डेपोमध्ये घुसून सुरक्षा रक्षकांच्या केबिनची तोडफोड केली होती. त्या घटनेनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोनवर संवाद साधत मोरे यांचे कौतुक केले होते.
मात्र याच घटनेवरून अजित पवार यांनी वसंत मोरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आगारातील घटना निश्चित दुर्दैवी आहे. अशा घटनांना आळा घालण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन सत्यता पुढे येऊ द्या. आरोपी सापडत नाही म्हणून तोडफोड करून स्वतःचे वेगळेपण दाखवू नका. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले तर तो पक्ष किंवा कार्यकर्त्याकडून त्याचा खर्च वसूल केला पाहिजे, असे कोर्टाने म्हटले आहे.
काय म्हणाले वसंत मोरे?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला वसंत मोरे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आदरणीय दादा, चार काचा फुटल्या तर त्याची काळजी आहे, मग आमच्या बहिणीच्या इज्जतीच्या काचा फुटल्या त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल मोरे यांनी केला आहे.