फक्त मुद्द्याचं!

18th June 2025
महाराष्ट्र

महाशिवरात्री कार्यक्रमावर प्राजक्ताने सोडले मौन

महाशिवरात्री कार्यक्रमावर प्राजक्ताने सोडले मौन

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : अभिनेत्री प्राजक्ता माळी पुन्हा एकदा वादामुळे चर्चेत आली आहे. हा वाद काय आहे, कशामुळे निर्माण झाला ते सविस्तर पाहू.

नाशिक येथे त्र्यंबकेश्वरला मंदिरात महाशिवरात्रीचा भव्य उत्सव साजरा केला जातो. या निमित्त देवस्थानकडून विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तिचे सहकलाकार शिवार्पणमस्तु नृत्य सादर करणार आहेत. मात्र, या कार्यक्रमाला मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध केला आहे. महाशिवरात्री हा धार्मिक उत्सव आहे. याठिकाणी सेलिब्रिटी व्यक्तींना बोलावून वेगळा पायंडा पाडला जाऊ नये, असे त्यांनी म्हटले आहे.

त्या म्हणाल्या की, “महाशिवरात्रीचा अतिशय पवित्र दिवस आहे. येथे धार्मिकच कार्यक्रम झाले पाहिजेत. प्राजक्ता माळी शिवस्तुती सादर करणार असतील, तरी त्याचा पुनर्विचार झाला पाहिजे. कारण मी स्वतः या मंदिराची माजी विश्वस्त आहे. शास्त्रीय नृत्य, कथ्थक नृत्य ठेवलं पाहिजे. पण सेलिब्रिटिंना आणून येथे एक वेगळाच पायंडा त्र्यंबकेश्वर देवस्थानने सुरू केलाय. हे चुकीचं घडतंय”, असा आक्षेप मंदिराच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी घेतला आहे.

प्राजक्ता माळी काय म्हणाली?
महाशिवरात्रीनिमित्त होणार हा कार्यक्रम पूर्णपणे शास्त्रीय-उपशास्त्रीय संगीतावर आधारित नृत्याचा कार्यक्रम आहे. अपुऱ्या माहितीवर आधारित कुणाचा गैरसमज झाला असेल, तर त्यांनी त्यांच्या मनातले गैरसमज काढून टाकावेत आणि समाजाची दिशाभूल करू नये अशी मी त्यांना विनंती करते. एक गोष्ट आवर्जून नमूद करू इच्छिते, की देवाच्या दारात कुणीही सेलिब्रिटी नसतं. सगळे भक्त असतात. त्याच भक्तीभावानं मी माझ्या नृत्याच्या माध्यमातून माझी सेवा नटराजाच्या चरणी रुजू करणार आहे.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"