भारत हा १४१ कोटी लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश !

जगाची लोकसंख्या ही ८.०९ अब्ज
वॉशिंग्टन : नववर्षाचे स्वागत करतानाच, संपूर्ण जगाच्या लोकसंख्येची आकडेवारीही समोर आली आहे. १ जानेवारी २०२५ रोजी जगाची लोकसंख्या ही ८.०९ अब्ज इतकी झाली आहे. २०२४ मध्ये विश्वाच्या लोकसंख्येत ७.१ कोटींनी वाढ झाली आहे. ही आकडेवारी अमेरिकेच्या जनगणना ब्युरोने जारी केली आहे.
१ जानेवारी २०२५ रोजी जगाची अंदाजित लोकसंख्या ८,०९२,०३४,५११ इतकी होणार आहे. १ जानेवारी २०२४ पेक्षा ही ७१,१७८,०८७ने जास्त आहे. २०२४मध्ये भारत हा १४१ कोटी लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश होता. अमेरिकेच्या जनगणना ब्युरोच्या मते, जानेवारी महिन्यात अमेरिकेत दर ९ सेकंदाला एका बालकाचा जन्म होणार असून दर ९.३ सेकंदाला एकाच्या मृत्यूचा अंदाज आहे.
जगात महासत्ता असलेल्या अमेरिकेने लोकसंख्येच्या बाबतीत तिसरा क्रमांक पटकावला असून त्यांची लोकसंख्या ३४ कोटी ११ लाख ४५ हजार ६७० इतकी आहे.
लोकसंख्येच्या बाबतीत भारत टॉपर
जुलै २०२४मध्ये भारत हा लोकसंख्येच्या बाबतीत जगातील पहिल्या क्रमांकाचा देश ठरला होता. भारताची अंदाजित लोकसंख्या ही १४०,९१,२८,२९८ इतकी आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीन असून त्यांची लोकसंख्या १४०,७९,२९,९२९ इतकी आहे.