लाडक्या बहिणींच्या राज्यात फक्त २१ महिला आमदार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : राज्यातील विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम नुकताच पार पडला. पक्ष फोडाफोडीच्या राजकारणातून सत्तांतर होणार की सत्ताधारी जनतेवरील आपली विश्वासाची पकड आणखी मजबूत करणार, याची चर्चा असतानाच लाडक्या बहिणींनी कमाल केली आणि देवाभाऊंच्या चमूला भरभरून मतं दिली. आता याच लाडक्या बहिणींच्या राज्यात मात्र २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महिला आमदारांची संख्या आधी पेक्षा कमी झाल्याचं लक्षात आलं आहे. मात्र, मंत्रिपदांच्या माध्यमातून महिलांना जबाबदारीची पदे दिली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
राज्यातले विधानसभेचे मतदान झाल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी झाली आणि महायुतीला बहुमत मिळाले आहे. यात महिला आमदारांची संख्या मात्र मागील निवडणुकीपेक्षा कमी झाल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत २१ महिला आमदार निवडून आल्या आहेत. तर २०१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत २६ महिला आमदारांना विधानसभेत स्थान मिळाले होते. आता ही संख्या रोडावली आहे. तरीही महिलांना जबाबदारीची मंत्रिपदे देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. शिक्षण किंवा महिला आणि बालविकास या नेहमीच्या खात्यांखेरीज आणखी नेमकी कोणती पदे या २१ पैकी किती महिलांच्या वाट्याला येतील, याची आता सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
सध्या राज्यामध्ये सरकार स्थापनेसाठी आणि शपथविधीसाठी लगबग सुरू आहे. सरकार स्थापन करण्याबाबत, मुख्यमंत्रीपदासाठी वर्णी लागण्याबाबत दिवसागणित नवीन बातम्या समोर येत आहेत. अशातच महिलांच्या नावाचीही चर्चा वेगवेगळ्या पदांसाठी होऊ शकते, अशी शक्यता आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षातून महिला उमेदवाराचा विजय झाला ते सविस्तर पाहूया.
ज्योती गायकवाड, आमदार धारावी मतदारसंघ- काँग्रेस
आदिती तटकरे, आमदार श्रीवर्धन मतदारसंघ- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
सना मलिक, आमदार अणुशक्ती नगर- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
सरोज अहिरे, आमदार देवळाली विधानसभा मतदारसंघ- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
सुलभा खोडके, आमदार अमरावती मतदारसंघ- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
संजना जाधव, आमदार कन्नड विधानसभा मतदारसंघ- शिवसेना (एकनाथ शिंदे)
मंजुळा गावित, आमदार साक्री विधानसभा मतदारसंघ- शिवसेना (एकनाथ शिंदे)
अनुराधा चव्हाण, आमदार फुलंब्री मतदारसंघ- भाजपा
स्नेहा पंडित, आमदार वसई विधानसभा मतदारसंघ- भाजपा
सुलभा गायकवाड, आमदार कल्याण पूर्व मतदारसंघ- भाजपा
श्रीजया चव्हाण, आमदार भोकर मतदारसंघ- भाजपा
नमिता मुंदडा, आमदार केज विधानसभा मतदारसंघ- भाजपा
मोनिका रजाळे, आमदार शेवगाव मतदारसंघ- भाजपा
माधुरी मिसाळ, आमदार पर्वती विधानसभा मतदारसंघ- भाजपा
विद्या ठाकूर, आमदार गोरेगाव मतदारसंघ- भाजपा
मनीषा चौधरी, आमदार दहिसर मतदारसंघ- भाजपा
मंदा म्हात्रे, आमदार बेलापूर मतदारसंघ- भाजपा
सीमा हिरे, न नाशिक पश्चिम मतदारसंघ- भाजपा
देवयानी फरांडे, आमदार नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ- भाजपा
मेघना बोर्डीकर, आमदार जिंतूर विधानसभा मतदारसंघ- भाजपा
श्वेता महाले, आमदार चिखली मतदारसंघ- भाजपा