वाहन चोराकडून 23 मोटरसायकली ताब्यात घेऊन 17 गुन्हे उघड!

वाकड पोलीस ठाण्याची कारवाई; 15 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
पिंपरी : वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटरसायकली चोरी प्रकरणी तपास पथकामार्फत सीसीटीव्ही कॅमेरेचे निरीक्षण व तांत्रिक तपास करत असताना मिळालेल्या बातमीवरून ज्ञानेश्वर शंकरराव जयस्वाल (वय 46, रा. आळंदी देवाची) या आरोपीस अटक करण्यात आली असून आरोपीकडून 23 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे प्रदीप जाधव यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोटरसायकली चोरीचे प्रमाण वाढल्याने तपास पथकाद्वारे तपास केला जात होता. आरोपी जयस्वाल यांच्याकडून 15 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 23 मोटरसायकली ताब्यात घेऊन 17 गुन्हे उघड करण्यात आले आहेत. आरोपी याने वाकड, आळंदी, उत्तर चाकण, चाकण, संत तुकाराम नगर, शिक्रापूर पुणे ग्रामीण, माणगाव जिल्हा रायगड या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोटरसायकली चोरी केल्या होत्या.
आरोपी ज्ञानेश्वर जयस्वाल हा खाजगी गाड्यांवर बदली चालक म्हणून काम करतो. तो मोज मजेसाठी गाड्या चोरायचा व मौज संपली की गाडी कुठेही लावायचा व दुसरी गाडी चोरायचा अशी त्याची पद्धत होती. आरोपी जयस्वाल यांच्याकडे मिळालेल्या वाहनांच्या मालकांशी संपर्क करून वाकड पोलीस तपास करत आहेत. याशिवाय वाकड पोलीस तपास पथकाने वेदप्रकाश मदनसिंग रावत (वय 35, रा.ताथवडे) यास अटक करून त्याचे कडून एक ऍक्टिवा मोपेड मोटर गाडी व संतोष मोहन मांगीलवाड (वय 28, रा.वेनुनगर, वाकड) यास अटक करून त्याच्याकडून एक जुपिटर मोपेड गाडी जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 चे प्रदीप जाधव, सुनील कुऱ्हाडे सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग ,यांच्या मार्गदर्शनाखाली वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास दराडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मारणे, पोलिस अंमलदार सहाय्यक पोलीस फौजदार दळे, पोलीस हवालदार चंदू गिरे, विजय भुसारे, मोहम्मद नदाफ, सचिन गायकवाड, विजय घाडगे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.

