फक्त मुद्द्याचं!

29th May 2026
गुन्हेगारी

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूने 13 जणांचा मृत्यू;आठ आरोपींना अटक!

पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूने 13 जणांचा मृत्यू;आठ आरोपींना अटक!

पिंपरी : पुणे व फुगेवाडी परिसरात विषारी दारू पिल्याने 13 जणांचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे.. हे मृत्यू कशाने झाले याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. पोलिसांनी हात झटकल्याने खरे कारण पुढे येत नव्हते . सात जणांपैकी चार जणांचा विषारी दारू पिल्याने मृत्यू झाल्याचे पोलीसांनी स्पष्ट केले आहे. पिंपरी चिंचवड मध्ये आठ व पुणे शहरात पाच अशा एकूण 13 मृत्यूची नोंद झाली आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी सहा तर पुणे पोलिसांनी दोन अशा एकूण आठ आरोपींना अटक केली आहे

viara vcc
viara vcc

फुगेवाडीतील सात जणांचा मृत्यू झाला आणि तिघे गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यात चारही जणांनी विषारी दारू पिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक चौकशी नुसार दापोडी पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवध, सदोष मनुष्य वध करण्याचा प्रयत्न करणे, गुन्हा करण्याचे उद्देशाने अपायकारक पदार्थाद्वारे इजा करणे , इतरांचे जीव धोक्यात आणणारी कृती, अपायकारक पेयांची विक्री, महाराष्ट्र दारूबंदी कायदे अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. योगेश वानखडे, राधेश्याम प्रजापति, कर्नलसिंग विरखा, गुरमीतसिंग विरखा, कल्पेश अग्रवाल, अरिहंत धोत्रे, आकाश जाधव, अशोक हांडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

दारूमध्ये मिथेनॉल मिसळले
उरुळी कांचन मधील राधेश्याम प्रजापती (वय 35) हा दारू तयार करण्याचे काम करतो. योगेश वानखेडे (वय 23) हा प्रजापतीकडून दारू खरेदी करतो. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वेगवेगळ्या दारूगुत्त्यांवर त्या दारूची विक्री केली जाते. योगेश वानखेडे हा दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार आहे .मात्र यावेळी योगेश वानखेडेने प्रजापतीकडून दारू खरेदी केल्यानंतर अधिक नफा कमावण्याच्या उद्देशाने त्या दारूमध्ये मिथेनॉल मिसळले. मिथेनॉल मुळे दारूचे प्रमाण दुप्पट झाले. मात्र यावेळी मिथेनॉल नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात मिसळले गेले आणि दारू विषारी बनली.
फुगेवाडी येथे दारूगुत्ता चालवणाऱ्या कर्नलसिंग विरखा आणि गुरमीतसिंग विरखा या बापलेकांना वानखेडे यांनी दारु विकली. योगेश वानखेडेने त्याच्या खडकी भागातील कल्पेश अग्रवाल आणि पुण्यातील वडारवाडी भागातील अरिहंत धोत्रे यांना देखील दारु विकली. पुण्यातील हडपसर आणि काळेपडळ भागात दारूगुत्ता चालवणारा आकाश जाधव आणि अशोक हांडे यांनायांना देखील दारु विकली. त्यामुळे हडपसर भागात देखील मृत्यू झाले आहेत.

पोलिसांना देखील जबाबदार धरण्याची मागणी
या विषारी दारू प्रकरणी पोलिसांना देखील जबाबदार धरण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. फुगेवाडी आणि दापोडी परिसरात हातभट्टी दारूचे अनेक गुत्ते बेकायदेशीरपणे चालवले जातात. याबाबत नागरिकांनी पोलिसांकडे तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र पोलिसांनी या गोष्टीकडे डोळेझाक का केली? याचे उत्तर सर्वांना माहिती आहे. आत्ता या घटनेनंतर ज्या भागात हे दारूचे गुत्ते आहेत त्या भागातील पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी नागरिक थेट पणे करत आहेत. या दारूच्या धंद्यांना कोणाचे पाठबळ आहे याची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांनी शहरातील बेकायदेशीर धंद्याबाबत वक्तव्य केले होते की,ज्या भागात अनाधिकृत आणि बेकायदेशीर धंदे चालू असतील त्यास संबंधीत पोलीस ठाणे जबाबदार राहील. आता या प्रकरणानंतर खरेच चौकशी होणार का? अशी चर्चा सुरू आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"