कार मधून 50 लाख रुपये चोरी ; दोन आरोपींना, अटक, साथीदारच निघाला गुन्हेगार!

शाखा युनिट दोन मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलीस ठाणे यांची कारवाई
पिंपरी : हॉटेल समोर रोडवर पार्किंग केलेल्या कारचे बनावट चावीने दरवाज्याचे लॉक खोलून कार मध्ये ठेवलेले 50 लाख रुपये चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट दोनने आठ तासाच्या आत ताब्यात घेतले.. ही घटना नऊ ऑक्टोबर रोजी रात्री पावणे अकरा ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास संदीप हॉटेल पुनावळे येथे घडली. फिर्यादी बरोबर मुंबई येथे पैसे आणण्यासाठी गेलेल्या साथीदारानेच चोरीचा प्लॅन केल्याचे उघड झाले.

याप्रकरणी प्रसाद शिवाजी बनकर (वय 29, रा.मु.पो. चिंबळी,ता. खेड), चारुदत्त शिवाजी बेंडाळे (वय 30, रा. मु. पो. निघोजे, बेंडाळे वस्ती, ता. खेड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेले 50 लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. बेंडाळे हे फिर्यादी बरोबर मुंबईस गेले होते त्यांनी आरोपी प्रसाद बनकर यास कारची बनावट चावी देऊन पैसे चोरी करण्यास सांगितले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रोहिदास पवार पोलीस उपायुक्त परिमंडळ 2, प्रदीप जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे (1), सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग सुनील कुर्हाडे यांनी शाखा युनिट दोन, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलीस ठाणे यांची पथके तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. पथकाने घटनास्थळास भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली.
एका इसमाने कार जवळ येऊन बनावट चावीने गाडीचा दरवाजा खोलून पन्नास लाख रुपये असलेली बॅग घेऊन गेल्याचे फुटेज मध्ये दिसून आले. त्या अनुषंगाने अधिक तपास केला असता फिर्यादी बरोबर मुंबई येथे पैसे आणण्यासाठी गेलेल्या दोन इसमापैकी संशयीत इसम चारुदत्त बेंडाळे या ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याचे अनुषंगाने कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने कारची बनावट चावी त्याचा मित्र प्रसाद बनकर यास देऊन कार मध्ये 50 लाख रुपये असले बाबत माहिती देऊन रक्कम चोरी करण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर प्रसाद शिवाजी बनकर यास चिंबळी येथून ताब्यात घेतले. बेंडाळे याचे कडून गुन्ह्यात चोरीस गेलेले 50 लाख रुपये हस्तगत करण्यात आले.
सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत, मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे, पोलीस उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, पोलीस उपनिरीक्षक राहुल खिळे, पोलीस हवालदार विक्रम कुदळ, कृष्णा शितोळे, गोविंद चव्हाण, आशिष बोटके, गणेश सावंत, विनोद विहीर, शामसुंदर गुट्टे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे रमेश कारके यांनी केली.

