Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

26th October 2026
महाराष्ट्र

अन्वी हिंगेची आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई!

अन्वी हिंगेची आशियाई शालेय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई!

ब्लिट्झमध्ये नऊपैकी आठ गुणांसह अव्वल; स्टँडर्ड प्रकारात रौप्यपदक
पिंपरी : भारताची युवा बुद्धिबळपटू आणि वुमन कॅन्डिडेट मास्टर किताबधारक अन्वी दिपक हिंगे हिने रशियातील तुला येथे १ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या विसाव्या आशियाई शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करत भारताच्या शिरपेचात आणखी दोन मानाचे तुरे रोवले आहेत. अन्वीने मुलींच्या नऊ वर्षांखालील गटात जलदगती ब्लिट्झ प्रकारात सुवर्णपदक, तर स्टँडर्ड प्रकारात रौप्यपदक पटकावले.

viara vcc
viara vcc

ब्लिट्झमध्ये आठ विजय; सुवर्णपदकावर मोहोर
अन्वीने ब्लिट्झ प्रकारात नऊ फेऱ्यांमध्ये आठ गुणांची कमाई करत स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले. तिच्या खात्यात आठ विजय आणि केवळ एका पराभवाची नोंद झाली. तिने नऊपैकी आठ गुण मिळवत दुसऱ्या क्रमांकावरील तुर्कमेनिस्तानच्या बागुल जुमायेवा हिला अर्ध्या गुणाने मागे टाकले. जुमायेवाला साडेसात गुणांसह रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर रशियाच्या लेयला इसायेवाने सहा गुणांसह तिसरे स्थान मिळवले. तिने स्पर्धेतील अनेक प्रमुख प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवला. कझाकस्तानच्या अमालिया येद्रेसहेवा, रशियाच्या मिया कुद्र्याशोवा आणि लेयला इसायेवा यांच्यावर मात करत तिने आपली गुणवत्ता सिद्ध केली.
स्पर्धेपूर्वी १,६१५ मानांकन असलेल्या अन्वीने आपल्या मानांकनापेक्षा सरस कामगिरी करत विजेतेपद मिळवले. ब्लिट्झ प्रकारात मर्यादित वेळेत अचूक निर्णय घेणे, प्रतिस्पर्ध्याच्या डावपेचांना तातडीने प्रत्युत्तर देणे आणि वेळेच्या दबावात शांत राहणे आवश्यक असते. अन्वीने या सर्व आघाड्यांवर प्रभावी कामगिरी केली.

स्टँडर्ड प्रकारातही रौप्यपदकाची कमाई
ब्लिट्झमधील सुवर्णयशाबरोबरच अन्वीने स्टँडर्ड प्रकारातही सातत्यपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले. मुलींच्या नऊ वर्षांखालील गटात तिने नऊ फेऱ्यांमध्ये साडेसहा गुण मिळवत दुसरे स्थान पटकावले. कझाकस्तानच्या अमालिया येद्रेसहेवाने आठ गुणांसह पहिले स्थान मिळवले, तर रशियाच्या मिया कुद्र्याशोवाने सहा गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला.

भारतासाठी खेळण्याचा अभिमान
आपल्या यशाबद्दल अन्वी म्हणाली, “भारतासाठी खेळताना सुवर्ण आणि रौप्य अशी दोन पदके जिंकून मला खूप आनंद झाला. ब्लिट्झमध्ये सुवर्णपदक जिंकणे माझ्यासाठी खूप खास आहे. स्पर्धेत अनेक चांगल्या खेळाडूंविरुद्ध खेळायला मिळाले आणि प्रत्येक डावातून काहीतरी नवीन शिकायला मिळाले. माझ्या आई-बाबांचे आणि माझ्या सर्व प्रशिक्षकांचे मला नेहमी सहकार्य मिळते. मला अजून चांगला खेळ करायचा आहे, माझे मानांकन वाढवायचे आहे आणि भविष्यात भारतासाठी जागतिक स्तरावर मोठी विजेतेपदे जिंकायची आहेत.”

अन्वी ही चिंचवड येथील एलप्रो इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथ्या इयत्तेत शिकत आहे. लहान वयातच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या अन्वीला तिचे प्रशिक्षक ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, आंतरराष्ट्रीय मास्टर निखिल दीक्षित आणि मानसिक प्रशिक्षण मार्गदर्शक ऋतू बळ्यान चौधरी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"