झेप्टो डिलिव्हरी बॉयचे अपहरण; लुटणारी सराईत टोळी अटकेत!

पिंपरी : झेप्टो स्टोअरच्या डिलिव्हरी बॉयची दुचाकी अडवून त्याचे अपहरण करीत मारहाण करून 90 हजारांची रोकड लुटणाऱ्या सहा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट 4 ने अटक केली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मोबाईल असा एक लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज शंकर चलवादी (वय 24, रा.मामुर्डी), दीपक दयानंद मंडगे (वय 24, रा. नर्हे, मूळ – रा. लातूर), अविनाश अरुण वानखेडे (वय 26, रा. नर्हे, मूळ- रा. वेल्हे), प्रथमेश उर्फ प्रतीक हरिभाऊ कंक (वय 27, रा. पनवेल ,रायगड), विराज उर्फ सनी युवराज हिरवे (वय 19, मामुर्डी), इसाक राजू राजापूरम (वय 28, रा.मामुर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे लोढा सोसायटी गहुंजे येथे ऑर्डर देऊन झेप्टो स्टोअर समोरून गहुंजे स्टेडियम मार्गे जात होते. त्यावेळी आरोपींनी त्याच्या दुचाकी समोर रिक्षा आडवी लावून फिर्यादीला जबरदस्तीने रिक्षात बसवून त्याचे अपहरण केले. मामुर्डी येथील स्मशानभूमी जवळील मैदानात नेऊन त्याला बेदम मारहाण करुन त्याच्याकडील 90 हजार रुपयांची रोकड लुटून आरोपी पसार झाले.
गुन्हे शाखेच्या युनिट 4 ने सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, संशयित्याच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण आणि बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला.
सहा जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि मोबाईल फोन असा एक लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींवर दरोडा आणि जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपींना तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे- पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर भोसले आणि त्यांच्या पथकाने केली

