गाडीच्या हप्त्यावरून तरुणाला दांडक्याने मारहाण!

पिंपरी : वाहनाच्या हप्त्यावरून झालेल्या वादातून एकाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत तरुणाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. भोसरी चक्रपाणि वसाहतीमध्ये 4 सप्टेंबर रोजी पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली.
दिगंबर सुभाष चिंतले [वय 36, रा. मोशी, मूळ- रा. निलंगा, जि. लातूर) यांनी फिर्यादी दिली आहे. नरसिंह गहिनीनाथ जगदाळे (वय 38, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी), तुलसीदास केरबा जगदाळे, लक्ष्मण केरबा जगदाळे आणि नरसिंगची भाची पप्पी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी नरसिंह यांनी फिर्यादीला फोन करून चक्रपाणि वसाहतीतील हनुमान मंदिराजवळ बोलावून घेतले. तेथे वाहनाच्या हप्त्यावरून आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. त्यानंतर त्याच्या पायावर लाकडी दांडक्याने मारहाण केली. फिर्यादी खाली पडल्यानंतर आरोपींनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

तृतीय पंथीयांच्या दोन गटात हाणामारी
पिंपरी : इंद्रायणी नदी घाटावर तृतीयपंथीयांच्या दोन गटात वाद झाला. या वादातून एका गटाने लोखंडी फायटरने हल्ला करून एकाला गंभीर जखमी केले. आळंदी येथील इंद्रायणी नदी घाटावर रविवार सहा सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
योगेश सतीश गणमोटे (वय 26, आळंदी, ता. खेड) यांनी फिर्यादी दिली आहे. सनम (रा. निगडी) यांच्यासह अन्य चार महिला आरोपी आणि दोन अनोळखी पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्यांच्या मैत्रिणी इंद्रायणी घाटावर बस्ती मागत होत्या. त्यावेळी निगडी येथील आरोपींनी त्यांच्याशी शिवीगाळ करत वाद घातला. त्यानंतर आरोपींनी लोखंडी फायटरने फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. आळंदी पोलीस तपास करत आहेत.

