सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांना यशवंतराव चव्हाण कृतज्ञता सन्मान पुरस्कार घोषित!

पिंपरी : यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक कृतज्ञता सन्मान आणि यशवंतराव चव्हाण जेष्ठ नागरिक संघ आणि संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान घोषित करण्यात आले असून सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांना दिव्यांग प्रवर्गातून सन्मानित करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

मुंबई येथे यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये 4 ऑक्टोबर रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. या सन्मानासाठी यशवंतराव चव्हाण जेष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान वैयक्तिक अंतर्गत महिला विभागातून रायगड येथील वृषाली मगदूम आणि नांदेड येथील भागीरथी बच्चेवार यांची निवड करण्यात आली आहे. पुरुष विभागातून लातूर येथील प्रकाश घादगिने, ठाणे येथील बबन पाटणकर यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. तसेच यशवंतराव चव्हाण जेष्ठ नागरिक संघ आणि संस्था राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान अंतर्गत सन्मानार्थि संघ म्हणून जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील ज्येष्ठ नागरिक संघ आणि सन्मानार्थि संस्था म्हणून पुणे येथील जनसेवा फाउंडेशन यांची निवड करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ओक खासदार सुप्रिया सुळे आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.


