विनेशचं स्वप्नं भंगलं

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक्स २०२४ मध्ये भारतासाठी सुवर्ण पदकाचं स्वप्न घेऊन गेलेली विनेश फोगाट अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरल्यामुळं हे स्वप्नं आता भंग पावलं आहे.
विनेश फोगाट ही ५० किलोग्रॅमच्या गटात कुस्ती खेळत होती. मात्र, सामन्यापूर्वी तिचं वजन ५० किलोग्रॅमपेक्षा काही ग्रॅम अधिक दाखवत होतं. त्यामुळं ती स्पर्धेसाठी पात्र नसल्याचं घोषित करण्यात आलं. विनेशकडून भारतीयांना खूप अपेक्षा असत्या आणि या अपेक्षा तिनं या सामन्यात निश्चित पूर्ण केल्या असत्या, अशी सगळ्यांनाच खात्री होती.
विनेशचा कुस्तीचा अंतिम सामना आज ५० किलो गटात खेळला जाणार होता. मात्र, सामन्यापूर्वी तिचं वजन फक्त १०० ग्रॅमनं जास्त असल्यानं तिला अपात्र ठरवलं गेलं. ती आता रौप्य पदकासाठी सुद्धा पात्र ठरू शकणार नाही. या सगळ्या बाबत भारतीय ऑलिम्पिक संघानं माहिती दिली आहे. संघाच्या प्रतिनिधींनी खूप प्रयत्न केले, तरीही तिला अपात्रच घोषित करण्यात आलं. उपान्त्य फेरीत विनेश फोगाटनं उत्तम कामगिरी केली होती. सहाजिकच सुवर्ण पदकासाठी देशवासियांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. क्यूबाची कुस्तीपटू गुजमान लोपेजी हिला विनेशनं ५-० असं हरवलं होतं.