पिंपरी चिंचवड महापालिका अतिरिक्त आयुक्तपदी विक्रांत बगाडे यांची नियुक्ती!

पूर्णवेळ आयुक्तांची नियुक्ती मात्र नाही?
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अतिरिक्त आयुक्तपदी विक्रांत बगाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून त्यांची अतिरिक्त आयुक्तपदी- (1 ) प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे.
प्रदीप जांभळे पाटील यांच्या बदलीनंतर हे पद रिक्त आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्या प्रियंका कुलकर्णी- छापवाले यांनी नियुक्तीचा आदेश दिला आहे. महापालिका निवडणूक कामकाजामुळे जांभळे पाटील यांना 15 नोव्हेंबर रोजी कार्यमुक्त करण्यात आले. तेव्हापासून हे पद रिक्त होते. अतिरिक्त आयुक्त म्हणून मुख्याधिकारी सह वर्गातील विजयकुमार खोराटे आणि तृप्ती सांडभोर कार्यरत आहेत. त्याचवेळी विक्रांत बगाडे यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती दोन वर्षासाठी असणार आहे .
यापूर्वी महसूल संवर्गातील सोलापूरच्या अप्पर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती केली होती. महसूल व वनविभागाने याबाबतचे आदेश जारी केले होते. मात्र नगर विकास विभागाचा आदेश न मिळाल्याने रुजू करून घेण्यास प्रशासकीय अडसर होता .परंतु त्यांचे नाव आता पुन्हा मागे पडले आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची दोन महिन्यापूर्वी बदली झाली आहे. तेव्हापासून महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त नाही .महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर हे अतिरिक्त कार्यभार पाहत आहेत. महापालिका निवडणुका असल्याने या ठिकाणी स्वतंत्र आयुक्त असणे आवश्यक असताना आजपर्यंत महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त का मिळाला नाही? याची चर्चा शहरात सुरू आहे.


