प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सदनिकांसाठी अर्ज

फक्त मु्द्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने डुडुळगाव येथे उभारलेल्या एक हजार १९० सदनिकांसाठी ॲानलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. लाभार्थी शहरातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असावा, अशी मुख्य अट आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पालिकेतर्फे डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरे बांधणे प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पांतील सदनिकांकरिता या शहराच्या हद्दीतील रहिवाशी असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गात येणाऱ्या नागरिकांकडून ३० ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२४ कालावधीत अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने प्राप्त अर्जांची छाननी करुन लाभार्थी निश्चित करण्यात येणार असल्याचे आयुक्त सिंह यांनी सांगितले.
योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना अटी व शर्ती पूर्तता करणे आवश्यक आहे तसेच अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्वीकारण्यात येणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले. अर्जदार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असावा. कुंटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपर्यंत असावे, अर्जदार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींचा नावे भारतात कुठेही घर अथवा मिळकत नसावी, या अटी आहेत.
पिंपरी-चिंचवड पालिकेमार्फत यापूर्वी चऱ्होली, रावेत, बोऱ्हाडेवाडी, पिंपरी व आकुर्डी येथील प्रकल्पांसाठी अर्ज केलेल्या परंतु, सदनिका प्राप्त न झालेल्या व प्रतिक्षा यादीमधील नागरिक नव्याने अर्ज करु शकतात.ऑनलाईन अर्जासोबत १० हजार रुपये अनामत रक्कम तसेच ५०० रुपये नोंदणी शुल्क असे एकूण १० हजार ५०० रुपये नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार आहेत. सदनिकांच्या सोडतीमध्ये विजेता न झालेल्या व प्रतिक्षा यादीमध्ये नाव न आलेल्या नागरिकांची अनामत रक्कम योजनेचा अर्ज भरताना नमुद केलेल्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने परत करण्यात येणार आहेत.
सदनिकेची एकूण किंमत १६ लाख ६४ हजार १७३ रुपये असणार आहे. यामध्ये केंद्रशासन प्रती सदनिका १ लाख ५० हजार रुपये अनुदान देणार असून राज्यशासनाद्वारे प्रती सदनिका १ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. तर लाभार्थी यांना १४ लाख १४ हजार १७३ रुपये प्रती सदनिका स्वहिस्सा भरावा लागणार आहे. पात्र अर्जदारांनी https://pcmc.pmay.org या सांकेतिक स्थळावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया करावी, असे आवाहन उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी केले आहे.
कागदपत्रे कोणती लागतील?
- उत्पन्नाचा दाखला (२०२३-२४)
- फक्त अर्जदाराचे जात प्रमाणपत्र
- फक्त महाराष्ट्रातील रहिवासी
- जात वैधता प्रमाणपत्र
- कुटुंबातील सर्वांचे आधार व पॅनकार्ड
- बॅंक पासबुक व मतदान ओळखपत्र
- महाराष्ट्रातील डोमिसाईल दाखला
आरक्षणनिहाय सदनिका माहिती
- सर्वसाधारण प्रवर्ग – ५९५
- अनुसूचित जाती – १५५
- अनुसूचित जमाती – ८३
- इतर मागास प्रवर्ग – ३५७
- दिव्यांग – ५% समांतर