सात ग्रॅम एमडी सह दोन तरुणांना घेतले ताब्यात!

पिंपरी : विक्रीसाठी एमडी अंमली पदार्थ घेऊन जाणाऱ्या तरुणासह अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात ग्रॅम एमडी, दुचाकी आणि मोबाईल असा 3 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई गुरुवार एक ऑक्टोबर रोजी रात्री पावणे बारा वाजता महाळुंगे – नांदे रस्त्यावरील व्हीटीपी सर्कल परिसरात केली.

याप्रकरणी पोलिस अंमलदार सुरज धनंजय टिळेकर यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तेजस तानाजी साळुंखे (वय 20, रा माण, ता. मुळशी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित तेजस साळुंखे आणि अल्पवयीन मुलगा यांच्याकडे सात ग्रॅम एमडी विक्रीसाठी बेकायदा बाळगल्याचे आढळले. पोलिसांनी अंमली पदार्थ , दुचाकी आणि दोन मोबाईल जप्त केले. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

लोखंडी खांब उचलण्यासाठी सुरक्षा न पुरवल्याने कामगार जखमी!
चाकण : कंपनीत क्रेनच्या साह्याने साडेतीन टन वजनाचा लोखंडी खांब उचलताना आवश्यक सुरक्षा व्यवस्था न पुरवल्याने पोल अंगावर पडून कामगार गंभीर जखमी झाला. ही घटना ही घटना मंगळवार 29 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास नाणेकरवाडी येथील वेलॉक्स इनफ्रायस्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत घडली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल नागनाथ पाटील यांनी याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. स्वप्निल सुरेश जाधव (वय 35, रा. नाणेकरवाडी, ता. खेड), निरंजन सरत नायक ((वय 42, रा. खेड, मूळ- रा. ओडिसा) आणि योगेश महादेव अमले (वय 47) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोनू शर्मा आणि अभिषेक भारत महतो क्रेन वर काम करत होते. लोखंडी पोल उचलण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, स्वतंत्र क्रेन ऑपरेटर व सुरक्षित लिफ्टिंगची साधने उपलब्ध केली नव्हती. त्यामुळे पोल अंगावर पडून शर्मा गंभीर जखमी झाले. या प्रकरणी सदोष मनुष्यवाधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकण दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस तपास करत आहेत.

