हायवा टेम्पोने पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार!

पिंपरी : हायवा टेम्पोने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकी वरील एक तरुण मरण पावला असून एकास गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना गुरुवार 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वडमुखवाडी सेल पेट्रोल पंपा समोर ता. हवेली येथे घडली.

याप्रकरणी धीरज युवराज चिकटे (वय 27, रा. हल्ली 52 खोल्या शेजारी, आमंत्रण कॉलनी, भोसरी, मूळ- शिवणखेड, ता. लातूर, जि. चाकुर) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हायवा टेम्पो चालक कैलास नारायण एडके (वय 26, रा. मोहन नगर गोडाऊन चौक, भोसरी, मूळ- रा. वाणी पिंपळगाव, ता. पालम, जि. परभणी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी आणि त्याचा मित्र विशाल चौगुले (वय 30, रा, टिंगरे नगर, विश्रांतवाडी, हे जेवण करून फिर्यादीकडील व्हेस्पा मोटरसायकल क्रमांक (एम एच, 14 /जे एन /0890 वरून कामावर परत जात होते. फिर्यादी हे आळंदी बाजूकडून पुणे बाजूकडे जात असताना पाठीमागून आलेल्या हायवा टेम्पो क्रमांक (एम एच, 14/एनपी/ 32 92) वरील चालक याने निष्काळजीपणे, अविचाराने फिर्यादीच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक देऊन अपघात केला. अपघातामध्ये फिर्यादीच्या उजव्या हाताला, पायाला व डोक्याला मार लागला. तसेच मित्र विशाल चौगुले (वय 30) यांचे मृत्यूस कारणीभूत ठरला. दुचाकीचे नुकसान झाले आहे. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कटपाळे हे तपास करत आहेत.

