विक्रीसाठी आणलेला तीन किलो गांजा सापळा लावून पकडला!

पिंपरी : विक्रीसाठी अंमली पदार्थ गांजा घेऊन आलेल्या एका व्यक्तीला संततुकाराम नगर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून एक लाख पन्नास हजार रुपये किंमतीचा दोन किलो 932 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई गुरुवार 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4:15 च्या सुमारास पिंपरी येथील साईलीला हाऊसिंग सोसायटीच्या मागील मोकळ्या जागेत करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस हवालदार संतोष भानुदास रजपूत यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राहुल उर्फ अशोक गौतम जगताप (वय 39, रा. विद्यालय नगर पिंपरी) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल जगताप यांच्याकडे विक्रीसाठी गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. झडती मध्ये त्याच्याकडे दोन किलो 932 ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजा जप्त करून त्याला अटक केली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत.

वाल्हेकरवाडी येथे जुगार अड्ड्यावर छापा!
पिंपरी : चिंचवड वाल्हेकरवाडी येथील पवना नदी पात्राजवळ मोकळ्या जागेत तीन पत्ती जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेने छापा टाकून दोघांना अटक केली. ही कारवाई गुरुवार 3 सप्टेंबर रोजी पहाटे सव्वातीनच्या सुमारास करण्यात आली.
गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस हवालदार उदय बद्रीनाथ खेडक यांनी फिर्याद दिली आहे. सोनू अर्जुन सिंग (वय 3 रा. डीपी रोड हडपसर, पुणे, मूळ- रा. झारखंड), भानुदास भरत सुरवसे (वय 24, रा. हनुमान मंदिराजवळ हिंजवडी, मूळ- रा. बिहार) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही जण पसार झाले. कारवाईत रोख 82 हजार 140 रुपये दुचाकी आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

