फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
पिंपरी-चिंचवड

थेरगाव,जिजामाता , नेहरूनगर आरोग्य सुविधा केंद्रांना भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र!

थेरगाव,जिजामाता , नेहरूनगर आरोग्य सुविधा केंद्रांना भारत सरकारतर्फे राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र!

हे मानांकन मिळवणारी पिंपरी चिंचवड ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या थेरगाव, जिजामाता आणि नेहरूनगर या तीन शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानकांनुसार (एनक्यूएएस) राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले आहे. हे मानांकन मिळवणारी पिंपरी चिंचवड महापालिका ही महाराष्ट्रातील पहिली महापालिका ठरली आहे.

viara vcc
viara vcc

या प्रमाणपत्रामुळे वैद्यकीय विभागाच्या गुणवत्तापूर्ण सेवांची राष्ट्रीय स्तरावर नोंद झाली असून, नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या आरोग्य सुविधांच्या विश्वासार्हतेलाही अधिक बळ मिळाले आहे.
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (एनक्यूएएस) हे संक्रमण नियंत्रण, क्लिनिकल केअर, रुग्ण हक्क, रुग्णालय व्यवस्थापन व सेवा सुधारणा अशा महत्त्वपूर्ण निकषांवर आधारित असते. या सर्व निकषांची पूर्तता करत संबंधित केंद्रांनी आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत आपला उच्च दर्जा सिद्ध केला आहे.

आरोग्य सुविधा केंद्रांना हे यश मिळवून देण्यासाठी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोरी नलवडे व शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक (सीक्यूएसी) डॉ. कोमल बनसोडे आणि संपूर्ण टीम यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले. तसेच डॉ. छाया शिंदे आणि डॉ. शैलजा भावसार यांचेही विशेष सहकार्य लाभले.

आरोग्य सेवांवर नागरिकांचा वाढतोय विश्वास
महापालिकेच्या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये स्वच्छता, सेवा-सुविधा आणि बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट या प्रक्रियांना जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचओ) आणि भारत सरकारच्या मानकांनुसार काटेकोरपणे अंमलात आणले जाते. नियमित निर्जंतुकीकरण, प्रतीक्षालयांची स्वच्छता, ओपीडी व्यवस्थापन आणि सुरक्षित उपचार वातावरणामुळे महापालिकेच्या आरोग्य सुविधांवर नागरिकांचा विश्वास वाढत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळालेले राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र हे वैद्यकीय विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नांचे फलित आहे. नागरिकांना उच्च दर्जाची, सुरक्षित आणि रुग्ण-केंद्रित सेवा देण्याचा आमचा संकल्प यामुळे अधिक दृढ झाला आहे. – डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, पिंपरी चिंचवड महापालिका

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"