फक्त मुद्द्याचं!

19th April 2025
अध्यात्म पिंपरी-चिंचवड

वाजत गाजत मंगलमूर्तींच्या पालखीचे मोरगावकडे प्रस्थान

वाजत गाजत मंगलमूर्तींच्या पालखीचे मोरगावकडे प्रस्थान

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : ढोल- ताशांच्या गजरात, मोरयाच्या नामाचा जयघोष करीत, मोठी दिमाखदार मिरवणूक काढत चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तींच्या पालखीने भाद्रपदी यात्रेसाठी आज (ता. ४) मोरगावकडे प्रस्थान ठेवले.

चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यात आज दुपारी बारा वाजता चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी समग्र पूजाविधी झाल्यानंतर श्री मंगलमूर्तींची स्वारी हाती घेतली त्यानंतर,चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री. जितेंद्र देव, श्री केशव विध्वांस, ॲड.देवराज डहाळे यांनी मंगलमूर्तीला पुष्पहार अर्पण केला.

त्यानंतर मोरया गोसावी देव मंडळाच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र देव यांनी श्री मंगलमूर्तींच्या स्वारीला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर ढोल – ताशाच्या गजरात पालखी श्री मोरया गोसावी समाधी मंदिराकडे मार्गस्थ झाली. तेथे श्री मोरया गोसावी आणि सप्त सत्पुरुषांच्या समाधीची श्री मंगलमूर्तींची भेट मंदार महाराज देव यांनी घडविली. चिंचवडमधील समस्त ग्रामस्थ या मिरवणुकीत उत्साहाने सहभागी झाले होते. मिरवणुकीत महिलांचा लक्षणीय सहभाग होता.

यावेळी मंदार महाराज देव यांच्या हस्ते भाविकांना डाळीच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर मंदार महाराज देव, विश्वस्त श्री जितेंद्र देव, ॲड. देवराज डहाळे, श्री. केशव विध्वांस यांच्या हस्ते या पालखी प्रस्थान सोहळ्यात उपस्थित माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, राजाभाऊ गोलांडे, विठ्ठल उर्फ नाना काटे, सुरेश भोईर, मधुकर चिंचवडे मास्तर, माजी नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे तसेच भारत केसरी पै.विजय गावडे, पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे माजी अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर मंदार देव महाराज आणि इतर सर्व विश्वस्त यांच्या हस्ते वाद्यांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ झाली. यावेळी भाविकांनी मोरयाच्या नामाचा प्रचंड जयघोष केला.

या भव्य मिरवणुकीत पुण्यातील नामवंत श्रीगजलक्ष्मी ढोल ताशा पथक सहभागी झाले होते. त्यानंतर समाधी मंदिर, गांधीपेठ, पावर हाउस चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाने भाटनगर, मुंबई-पुणे महामार्ग, खडकी, वाकडेवाडी, शनिवारवाडा, लक्ष्मीरस्त्याने जाऊन एकनाथ मंगल कार्यालयाकडे पालखी मार्गस्थ झाली. एकनाथ मंगल कार्यालयातच बुधवारी (ता. ४) पालखीचा मुक्काम असेल.

गुरुवारी (दि. ५ ) पहाटे साडेचार वाजता पालखी प्रस्थान करेल. एकनाथ मंगल कार्यालयातून भवानीपेठ, रामोशी गेट, भैरोबा नाला, दिव्य वाटिका आश्रम, दिवेघाट, सासवड बाजारातून कऱ्हाबाई मंदिरात दुसरा मुक्काम असेल, पालखी शुक्रवारी (दि.६) सकाळी मंदिरातून शिवरी, रासकर मळ्याच्या दिशेने निघेल. श्री क्षेत्र जेजुरी, मावडी, ढोले मळामार्गे मोरगाव येथे रात्री नऊ वाजता पालखी पोहोचेल.

त्यानंतर शनिवार (७ सप्टेंबर) आणि रविवारी (८ सप्टेंबर) पालखीचा मुक्काम मोरगाव येथेच असेल. ९ सप्टेंबरपासून पालखीचा परतीचा प्रवास सुरू होईल. श्री क्षेत्र जेजुरी, श्री कऱ्हाबाई मंदिर सासवड, दिव्य वाटिका आश्रम वडकी ,एकनाथ मंगल कार्यालय,पुणे या ठिकाणी मुक्काम करीत १३ सप्टेंबरला पालखी पुन्हा चिंचवड येथील मंगलमूर्ती वाड्यात येईल.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"