पिंपरी-चिंचवडमध्ये वाढले नदी आणि वायू प्रदूषण

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : गतवर्षीच्या तुलनेत शहरात वाहनांच्या संख्येत १६ टक्क्यांनी वाढ, औद्योगिकरणात वाढ, सणासुदीच्या काळात वाढते धुलीकणांचे प्रमाण आदी गोष्टी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यंदाच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘पर्यावरण सद्यस्थिती अहवाल’ तयार केला आहे. त्यात वाहनांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १६ टक्क्यांनी वाढ झाली असून लोकसंख्येपैकी ७९.५० टक्क्के नागरिक साक्षर आहेत. औद्योगिकीकरणामध्ये प्रमाणात वाढ होत आहे, धुलीकणाचे प्रमाण हे सणासुदीच्या काळात मर्यादेपेक्षा अधिक आढळून आले. नदीमध्ये जाणारे सांडपाणी, कपडे, धुणे आणि नाले प्रदूषित असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या दिवंगत माजी महापौर मधुकरराव पवळे सभागृहात झालेल्या बैठकीत आयुक्त शेखऱ सिंह यांच्याकडे अहवाल सादर केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता संजय कुलकर्णी उपस्थित उपस्थित होते.
शहरातील सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, धुलीकण, अतिसूक्ष्म धुलीकणांची पातळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या मानांकनानुसार विहीत मर्यादेमध्ये असल्याचा निष्कर्ष अहवालात नमूद केले आहे. धुलीकणाचे प्रमाण हे सणासुदीच्या काळात मर्यादेपेक्षा अधिक आढळून आले आहे.
शहरातील नदीमध्ये जाणारे सांडपाणी, कपडे, धुणे अशा विविध गोष्टींमुळे पाण्याची गुणवत्ता ढासळते. शहरातील सर्व नद्यांना मिळणारे नाले प्रदूषित असल्याचे या अहवालातून निदर्शनास येते. पवना नदी शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहत असल्याने अधिकांश नाले या नदीत मिसळतात तर इंद्रायणी नदी औद्योगिक क्षेत्रातून वाहत असल्याने या नद्या प्रदूषित होत असल्याचा निष्कर्ष अहवालात नोंदविला आहे.
आयुक्त सिंह म्हणाले, ”पाणीपुरवठा, जलनि:सारण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, रस्ते, घनकचरा, हरितक्षेत्र, उद्यान विकास संवर्धन अशा अनेक सुविधा महापालिकेमार्फत पुरविल्या जातात. या सर्व सुविधांचे व्यवस्थापन करताना त्याचा शहराच्या पर्यावरणावर आणि नागरिकांच्या राहणीमानावर परिणाम होत असतो. त्या दृष्टीने पर्यावरण सद्यस्थिती अहवाल महत्वपूर्ण आहे. शहराच्या शाश्वत तसेच पर्यावरणपुरक विकासासाठी हा अहवाल दिशादर्शक ठरेल.’
शहरात ७९.५० टक्के नागरिक साक्षर
शहरातील एकूण लोकसंख्येपैकी ७९.५० टक्क्के नागरिक साक्षर आहेत. त्यापैकी ५७ टक्के पुरुष आणि ४३ टक्के महिला साक्षर असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महापालिकेच्या वतीने सन २०२२-२३ मध्ये १९० उद्याने विकसित केली असून ३२ लाख १६ हजार ७४९ झाडे लावली आहेत. शहराच्या औद्योगिकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे या अहवालातून दिसून येते. शहरातील कारखान्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
गणेशोत्सव, दिवाळी, उत्सव तसेच उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यातील ध्वनी पातळीची आकडेवारी या नमूद करण्यात आली आहे. सण-उत्सवाच्या काळात विशिष्ट ठिकाणी ध्वनी पातळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या निर्धारित मानांकनापेक्षा वाढली असल्याचे अहवालात दर्शविले आहे.
काय आहेत निष्कर्ष?
- एकूण नोंदणीकृत वाहनांच्या संख्येत गतवर्षीच्या तुलनेत सुमारे १६ टक्क्यांनी वाढ
- दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक
- नोंदणीकृत वाहनांच्या ९ टक्के वाहने इलेक्ट्रिक वाहने
- तीन वर्षात सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढला
- ई-वाहन वापरण्यावर नागरिकांनी भर

