सोसायट्यांमधील फ्लॅटधारकांच्या शेअर सर्टिफिकेटवर चढणार मालमत्ताकराच्या थकीत रकमेचा बोजा!

फ्लॅटधारकांकडे 180 कोटीं इतक्या रक्कमेचा मालमत्ता कर थकित
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत सर्वसाधारणपणे 6 हजार 644 इतक्या गृहनिर्माण संस्थां / सोसायट्या कार्यरत आहेत. या गृहनिर्माण संस्था/ सोसायट्यामधील 77 हजार 886 इतक्या सदनिकाधारकांकडे / फ्लॅटधारकांकडे 180 कोटीं इतक्या रक्कमेचा पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचा मालमत्ता कर थकित आहे.
वर नमूद फ्लॅटधारकांनी त्यांचे फ्लॅटचा चालू आर्थिक वर्षाचा अथवा थकीत वर्षीचा मालमत्ता कर महानगरपालिकेकडे जमा करावा म्हणून त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाकडे उपलब्ध असलेल्या त्यांचे मोबाईल क्रमांकावर यापूर्वी वेळोवेळी मेसेज केले आहेत. त्याशिवाय प्रत्येक फ्लॅटधारकाचा/सदनिकाधारकाचा महानगरपालिकेकडे जो मोबाईल क्रमांक उपलब्ध आहे त्याक्रमांकावर दूरध्वनी करून मालमत्ता कर भरण्यासाठी विनंती करणेत येत आहे. सबब, सर्व फ्लॅटधारक व सदनिकाधारकांनी त्यांचे मोबाईल क्रमांक महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाकडे अद्ययावत असलेची खात्री करावी आणि योग्य मोबाईल क्रमांक नसलेस तो अद्ययावत करुन घ्यावा असे आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाने केले आहे. मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळावर जाऊन नागरिक टॅबमधील मिळकत कर यावर क्लिक करावे. त्यानंतर संकेतस्थळाच्या स्क्रिनवर येणाऱ्या ‘मालमत्तेस मोबाईल क्रमांक जोडा’ लिंकवर क्लिक करुन आपल्या मालमत्तेची माहिती भरल्यानंतर नविन मोबाईल क्रमांकाची नोंद करायची असल्यास मोबाईल क्रमांक भरुन आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करावी. त्यांनतर आपण आपला प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर संबधित सहाय्यक मंडलाधिकारी यांच्याकडून सहमती आल्यानंतर आपल्या मालमत्तेस मोबाईल क्रमांक अद्ययावत होईल. त्याबरोबर, दुसरा मोबाईल क्रमांक अद्ययावत करायचा असल्यास वरील प्रक्रियेद्वारे तो अद्ययावत करावा. यामध्ये पहिल्या मोबाईल क्रमांकावर येणाऱा ओटीपी व अद्ययावत करण्यात आलेल्या क्रमांकावर ओटीपीद्वारे व्हेरिफिकेशन केल्यानंतरच तो बदलण्यात येईल.
याशिवाय करसंकलन विभागाने यापुर्वीच शहरातील सर्व सोसायट्यांना कर थकित असलेल्या फ्लॅटधारकांची/सदनिकाधारकांची यादी सोसायटीचे अध्यक्ष/सचिव यांना पाठविली असून उपरोक्त यादी सोसायटीच्या नोटीस बोर्डवर, सोसायटीचे दर्शनी भागात लावणेची, सोसायटीचे व्हाट्सअप ग्रुपवर शेअर करणेची तसेच मालमत्ता कर थकित असणाऱ्या फ्लॅटधारकांना त्यांचे मोबाईलवर वैयक्तिकरित्या फोन करुन मालमत्ता कराचा भरणा विहित मुदतीत करणेबाबत सोसायटीचे सन्मानीय अध्यक्ष व सचिव यांना विनंती करणेत आली आहे. सबब, वर नमूद फ्लॅटधारकाकडे/सदनिकाधारकाकडे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा मालमत्ता कर थकीत असल्यामुळे यांची नावे सोसायटीच्या नोटीस बोर्डवर, सोसायटीचे दर्शनी भागात, सोसायटीचे व्हाट्सअप ग्रुपवर प्रसिद्ध करणेत आली आहे. परंतू हे सर्व करुनही वर नमुद फ्लॅटधारकांनी/सदनिकाधारकांनी मालमत्ताकराचा भरणा अद्यापही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे केलेला नाही.
सर्व गृहनिर्माण संस्था/ सोसायटीचे सभासद नियुक्त संचालक मंडळ असते. संचालक मंडळात प्रामुख्याने सोसायटीच्या अध्यक्ष व सचिवांचा समावेश असतो. सर्व सोसायट्या संबधित फ्लॅटधारकाला शेअर सर्टिफिकेट देते. व त्याची एक प्रत सोसायटी अध्यक्ष व सचिवांकडेसुध्दा असते. याशिवाय याची एक नोंदवही सुध्दा सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांचेकडे जतन केलेली असते. त्यामुळे सोसायटीमधील फ्लॅटधारक/सदनीकाधारक यांची फ्लॅटच्या/सदनिकेच्यापोटी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे मिळकतकराची थकबाकी प्रंलबित असलेस अशा थकीत मिळकतकराची थकबाकीची नोंद फ्लॅटधारकाचे/सदनिकाधाराचे शेअर सर्टिफिकेटवर होणेबाबत सोसायटीचे अध्यक्ष व सचिवांना विनंती करणेत येत आहे. याबाबत गरज असलेस आवश्यक तो पत्रव्यवहार उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर क्र. 3 व 6, पिंपरी चिंचवड यांचे कार्यालयाशी करणेत येईल. शहरातील सर्व सोसायट्यांचे अध्यक्ष व चेअरमन यांना करसंकलन विभागाकडून थकीत कर असणाऱ्या मालमत्ताधारकांच्या शेअर सर्टिफिकेटवर मालमत्ताकराच्या देय रकमेच्या नोंदी ठेवणेबाबत लेखी पत्राद्वारे कळविण्यात येत आहे.
सर्व सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने लेखी पत्र दिल्यावर संबधित फ्लॅटधारकाच्या/सदनिकाधारकाच्या शेअर सर्टीफिकेटवर थकीत मालमत्ता कराच्या नोंदी घेणे शक्य होईल. यामुळे फ्लॅटचे/सदनिकेचे हस्तांतरण होतेवेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची थकबाकी असलेस सोसायटीचे अध्यक्ष/सचिव यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मालमत्ता कर भरलेशिवाय नाहरकत प्रमाणपत्र देता येणार नाही.
संबधित गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या/सोसायटीच्या फ्लॅटधारकाकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची मिळकतकराची थकबाकी असलेस आणि त्याची नोंद त्याचे शेअऱ सर्टीफिकेटवर वर आलेस आणि संबधित फ्लॅटधारकाने संबधित फ्लॅट हस्तांतरण करण्याचे निश्चित झाल्यास फ्लॅट खरेदी घेणाऱ्यांची यामुळे फसवणूकसुध्दा होणार नाही.
ही सर्व प्रक्रिया केलेनंतरही सोसायटीमधील फ्लॅटधारकांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा मालमत्ता कर जमा न केलेस त्यांना सोसायटीच्या निवडणुकीत मतदानास अपात्र करणेबाबत आणि निवडणुकीत संचालक मंडळावर सभासद होणेकरीता अपात्र करणेबाबत आवश्यक तो पत्रव्यवहार उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर क्र. 3 व 6, पिंपरी चिंचवड यांचे कार्यालयास करणेत येणार आहे.
रहिवासी मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा ३१ मार्च २०२५ पूर्वी करावा
“पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा रहिवासी मालमत्तेपोटी ३०० कोटी, बिगरनिवासी मालमत्तेपोटी ७८ कोटी इतका मालमत्ताकर दि.१५ मार्च २०२५ अखेर वसुल झालेला नाही. रहिवासी मालमत्ताधारकांकडे अद्यापही मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत आहे. मी सर्व पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेच्या रहिवासी मालमत्ताधारकांना आवाहन करतो की, आर्थिक वर्षाचे केवळ १५ दिवस शिल्लक राहिले असल्यामुळे आपण आपला मालमत्ताकर तात्काळ महानगरपालिकेकडे जमा करुन महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पिंपरी – चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक, शेखर सिंह यांनी केले आहे.