लग्नाचे अमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक!

पिंपरी : लग्नाचे आमिष दाखवून युके वरून कुरियरने किंमती साहित्य पाठवले असे सांगून डीएचएल कुरिअर कंपनीचे कामगाराने कस्टम ड्युटी म्हणून पाच लाख तीन हजार रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक केली. ही घटना 15 जून पासून आज पर्यंत इंस्टाग्राम वरून फिर्यादी यांचे राहत्या घरी घडली.

याप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. रेहान (संपूर्ण नाव ,पत्ता माहित नाही), व्हाट्सअप धारक, डीएचएल कुरिअर कंपनीचे कामगार आकाश वर्मा (संपूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) आणि बँक अकाउंट धारक यांच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने इंस्टाग्राम वर लग्नासाठी मुलगी पाहिजे अशी पोस्ट प्रसारित केली. त्यावरून फिर्यादी महिलेने क्लिक केल्यानंतर आरोपी क्रमांक एक याने लग्नासाठी मुलगी पाहिजे हे कारण देऊन फिर्यादीची चॅटिंग करून नंतर फिर्यादीस लग्नाचे आमीष दाखविले. फिर्यादीसाठी आरोपीने ‘युके’वरून अधिक किंमती ज्वेलरी, डायमंड, कपडे ,फुटवेअर आणि आयफोन असे किंमती साहित्य खरेदी केल्याचे फिर्यादीला सांगून विश्वास संपादन केला.
सदरचे किंमती पार्सल कुरिअरने पाठवले असे भासवून डीएचएल कुरिअर कंपनीचा कामगार आरोपी क्रमांक दोन यांनी सदरचे पार्सलची कस्टम ड्युटी म्हणून 5 लाख तीन हजार रुपये भरण्यास भाग पाडले. त्यानंतर परत सदर पार्सलचे इन्शुरन्स साठी 5 लाख 80 हजार रुपयांची मागणी केली .त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आल्याने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नांदेकर हे तपास करत आहेत.

